शिवरायांच्या स्मारकावरुन राजकारण !

February 7, 2014 2:18 PM0 commentsViews: 1133

shivaji maharaj idol07 फेब्रुवारी : राज्य सरकारच्या अनेक घोषणांपैकी एक म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारक. अरबी समुद्रातील हे प्रस्तावित स्मारक हे जगातलं सर्वात उंच स्मारक करण्याचा मानस राज्य सरकारने व्यक्त केला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण ही स्मारकाची घोषणा केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना गाजर दाखवण्याचा प्रकार आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. पण शिवनेरी असो की, रायगड दोन्ही ठिकाणी मात्र सरकारी उपेक्षाच पाहायला मिळते. अशावेळी अरबी समुद्रात महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभारण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे.

गेल्या 2010 च्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद केली गेली. सर्वेक्षण करुन संकल्पचित्रही तयार करण्यात आलं. त्यासाठी 3 कोटी 90 लाख रुपयांचा खर्चही झाला. पण पुढे काहीच झाल नाही. आता पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार जाग झालं असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

स्मारकासाठी नव्याने तरतूद केली असली तरी,पुन्हा सर्वेक्षण, नवं संकल्पचित्र, नवा आर्किटेक्ट, नवा कन्सलटंट आणि अनेक परवानग्या राज्य सरकारला मिळवायच्या आहेत. तोपर्यंत खरंतर आगामी विधानसभा निवडणूकही झालेली असेल. त्यामुळेच विरोधी पक्ष नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारवर जोरदार टीका केलीय.

पण सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बोलण्यातून, मात्र महाराजांच्या स्मारकाचं राजकारणच होईल हे स्पष्ट दिसत असल्याचं विरोधकांचं म्हणम आहे. सरदार पटेलांचं स्मारक असेल किंवा शिवाजी महाराजांचं स्मारक इथं पुतळ्याची उंची महत्वाची नाहीच, महत्वाचं आहे ते राजकारण जनतेला हे काही वेगळं सांगायची गरज नाही असा टोला विरोधकांनी लावला आहे.

close