घोषणांचा पाऊस पण तिजोरीत खडखडाट !

February 7, 2014 3:30 PM0 commentsViews: 791

ajit pawar cm407 फेब्रुवारी :  आत्तापर्यंत सुस्त असलेलं राज्य सरकार एकाएकी कामाला लागलंय. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने धडाकेबाज निर्णयांची मालिका सुरू केलीय. गेल्या महिन्याभरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या 6 बैठकांतून तब्बल 52 निर्णय घेतले आहेत.

त्यातले बहुतांश निर्णय लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडणारे आहेत. प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 100 कोटींची मंजुरी,अंगणवाडी सेविका, शिक्षक,प्राध्यापक,होमिओपॅथी डॉक्टर्स, दुर्धर आजाराचे रुग्ण,शेतकरी, मजूर आदींना विशेष सवलती देणारे निर्णय घेण्यात आले आहेत.

या सर्व निर्णयांपोटी कित्येक हजार कोटींचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. लोकप्रिय निर्णयांची मालिका सुरू झालीय ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा दिल्यानंतर..बरोबर महिनाभरापूर्वी म्हणजे 8 जानेवारीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवारांनी मुख्यमंत्री निर्णय घेत नसल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर आतापर्यंत म्हणजे मंत्रिमंडळाच्या एकूण 6 बैठकांमध्ये तब्बल 52 निर्णय घेण्यात आले आहे.

आधीच चालू वर्षाच्या बजेटमधील तरतूदींना 20 टक्के कपात लावण्यात आलीय. त्यात या लोकप्रिय निर्णयांमुळं निधीअभावी मोठ्या प्रमाणात विकासकामं रखडणार आहेत. दरम्यान, सरकारच्या या भूमिकेला विरोधी पक्ष नेत्यांनी कडाडून विरोध केलाय. तर निवडणुका जवळ आल्यावर निर्णय झटपट घेतले जातात. कुणी मागणी न करता 12 सिलेंडरचा निर्णयसुध्दा तातडीनं घेण्यात आला, असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय. सरकारच्या या भूमिकेला विरोधी पक्ष नेत्यांनी कडाडून विरोध केलाय.

होऊ दे खर्च!

राज्याची कर्ज काढण्याची मर्यादा संपलेली नाही, अशी भूमिका राज्य सरकार वारंवार मांडतंय. पण, सध्या राज्याच्या तिजोरीवर 2 लाख 92 हजार कोटी म्हणजे तब्बल 3 लाख कोटी रुपयांचं कर्ज झालंय. या कर्जाच्या रकमेपोटी राज्य सरकारला महिन्याला 30 हजार कोटी रुपयांचं व्याज भरावं लागतंय. ही सगळी आर्थिक जुळवा-जुळव करण्यासाठी राज्य सरकार महिन्याला पंधराशे कोटी रुपयांचे कर्ज रोखे विकतंय.

अशा प्रकारे गेल्या एप्रिल 2013पासून ते आजतागायत  कर्ज रोख्यातून 21 हजार 700 कोटी रुपयांचं इतकं कर्ज उभारलंय. महाराष्ट्र राज्य विकास कर्ज अर्थात एनएसडीएल राज्य सरकारला काढावं लागलंय. एवढंच नाही तर चालू बजेटला 20 टक्के लेखी कपात तर अतिरिक्त 20 टक्के तोंडी कपात लावण्यात आलीय. म्हणजेच अप्रत्यक्षपणे एकूण 40 टक्के कट बजेटला लावण्यात आलाय. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात राज्य मंत्रिमंडळानं 10 हजार पाचशे कोटी रुपयांच्या घोषणा केल्या आहेत.

राज्याची आर्थिक परिस्थिती

  • - राज्य सरकारवर कर्ज – 2 लाख 92 हजार कोटी रु.
  • - महिन्याला व्याज – 30 हजार कोटी रु.
  • - महिन्याला 1500 कोटींच्या कर्ज रोख्यांची विक्री
  • - चालू आर्थिक वर्षात रोख्यांतून 21,700 कोटीं कर्ज उभारलं
  • - चालू बजेटला प्रत्येकी 20% लेखी आणि तोंडी कपात
  • - गेल्या महिनाभरात 10,500 कोटींच्या घोषणांचा पाऊस
close