फिल्म रिव्ह्यु : ‘हंसी तो फंसी’

February 7, 2014 11:23 PM0 commentsViews: 2367

अमोल परचुरे, समीक्षक

हंसी तो फंसी…सिध्दार्थ मल्होत्रा आणि परिणिती चोप्रा यांची केमिस्ट्री रंगणार का याची तुम्हाला उत्सुकता असेल, प्रोमोज बघून स्टोरीबद्दलही उत्सुकता असेल, अशीच उत्सुकता मनात ठेवून मी सिनेमा बघायला गेलो. पण सुरुवातीच्या काही सीन्सनंतरच सिनेमाचा अंदाज यायला लागला. खरंतर, हा टिपिकल करण जोहर स्टाईल सिनेमा आहे. ‘ये जवानी है दिवानी’ सारखी स्टोरीमध्ये वळणंवळणं ठेवायचा प्रयत्न केलाय, पण अनेक ठिकाणी लांबलेल्या सीन्समुळे 141 मिनिटांचा हा सिनेमा सहज 100 मिनिटांमध्ये बसवता आला असता असं वाटतं. यातली पात्र नीट डेव्हलप होत नसल्यामुळे, सिनेमा बघताना फार इंटरेस्ट निर्माण होत नाही. खास करून परिणिती चोप्राचं कॅरेक्टर नेमकं काय आहे, तिला नेमका काय आजार आहे हेच लक्षात येत नाही, त्यामुळे ती कधी वेडी वाटते, कधी ड्रग ऍडिक्ट वाटते तर कधी ‘शुद्ध देसी रोमान्स’मधल्या कॅरेक्टरसारखी वाटते. लेखनातल्या या अशा त्रुटींमुळेच या सिनेमात आपण रमत नाही.

काय आहे स्टोरी ?
47 hasee to phasee poster 63
ही गोष्ट आहे निखिल आणि मिताची…अगदी अपघाताने ही दोघं एकमेकांना भेटतात. खरंतर निखिलच्या लग्नाची गडबड सुरू असताना मिताचं भेटणं, तिची अवस्था बघून तिला मदत करणं या सगळ्यात निखिलची धांदल उडते. मग ब्रेकअपची फिलासॉफी, आयुष्यात येणारा चान्स हा नेहमी सेकंडलास्ट चान्स असतो, अशा टिपिकल करण जोहरच्या सिनेमात असणार्‍या गोष्टी दिसत राहतात. आता लग्नघर असल्यामुळे त्यात नातेवाईकांची गर्दी असते. काका-काकू, मामा-मामी असे सगळे बॉलीवूड लग्नात लागणारे सगळे मेंबर्स इथेही आहेत. काही प्रसंगात त्यांच्यामुळे मजा येते, पण बाकीवेळ ते एक्स्ट्राज सारखे वावरत असतात. मिताचं कुटुंब तर एकदम गुजराती, भुलेश्वरला साडीचा व्यापार करणारं, त्यामुळे त्या घरातली लगबग आणखी जास्त आणि या सगळ्या गोंधळात निखिल आणि मिताचं प्रेम फुलायला लागतं. शेवट काय होणार याचा अंदाज इंटरव्हललाच आलेला असतो त्यामुळे लांबलेला क्लायमॅक्स बघताना पुन्हा बोअर व्हायला होतं.

परफॉर्मन्स
y543 3475
अभिनयाबद्दल बोलायचं तर सर्वात आधी मनोज जोशी बद्दल बोलायला लागेल. मिताच्या वडिलांच्या रोलमध्ये त्यांनी कमाल अभिनय केलाय. त्यांच्या वाट्याला आलेले सीन्स तसे कमी आहेत, पण खणखणीत आणि कडक कमा केलेलं आहे. अशा प्रकारचे सिरीयस रोल्स त्यांच्या वाट्याला फारसे आलेले नाहीत, पण आपण रंगभूमीवरुन आलोय आणि आपण किती व्हर्सटाईल आहोत हे त्यांनी दाखवून दिलंय. बाकी परिणितीने काम चांगलं केलंय, पण तिचं कॅरेक्टरच चांगलं लिहीलेलं नसल्यामुळे तिचा वेडेपणा थोडा अतिरेकी वाटायला लागतो. सिध्दार्थ मल्होत्रा तर अजून अभिनयाच्या बाबतीत ‘स्टुडंट’च आहे, त्याचं कॅरेक्टर गोंधळलेल्या तरुणाचं आहे, पण रोलची इंटेसिटी त्याच्या अभिनयात कुठेच दिसत नाही. करिश्माच्या रोलध्ये नवोदित अदा शर्मा हिने चांगला अभिनय केलाय. एकंदरित, सिनेमातले प्रसंग जर वेगवेगळे बघितले तर आवडू शकतात, पण सिनेमा म्हणून बघताना फार मजा येत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे ‘हंसी तो फंसी’ या टायटलचा सिनेमाच्या स्टोरीशी काहीही संबंध नाहीये.

रेटिंग 50

close