आवड…गरज आणि गॅजेट्स

February 9, 2014 2:25 PM3 commentsViews: 2263

amruta dhurve- अमृत्ता दुर्वे, सीनिअर  एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत

गेल्या दोन आठवड्यात तीन व्यक्तींसोबत नवीन मोबाईल फोन घेण्यासाठी जाणं झालं. तीनही व्यक्ती वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या गरजा आणि वापर असणाऱ्या. पहिल्या होत्या बँकेतून रिटायर झालेल्या एक मावशी. फोन घ्यायचाय, असं सांगायला फोन आला तेव्हाच त्यांनी मला ठासून सांगितलं, ‘स्मार्टफोन’ घ्यायचाय. दुसरा होता नोकरी करणारा, बहुतेक सगळी कामं इंटरनेटवर करणारा, भरपूर ट्रॅव्हल करणारा तरूण, तर तिसरी वर्किंग वुमन.

तुमच्या गरजा नेमक्या काय आहेत, कशाकशासाठी त्या फोनचा वापर होणार हे लक्षात घेऊन त्यानुसार फोन घेणंच योग्य. ज्या गोष्टी आपण वापरणार नाही, त्याचे पैसे कशाला द्यायचे? नुसतं मिरवण्यासाठी हाय-एन्ड फोन घेण्यात अर्थ नाही. फोन घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी – ज्याप्रमाणे सर्वगुणसंपन्न सून किंवा जावई मिळणं शक्य नाही, त्याचप्रमाणे सर्वगुणसंपन्न – सगळी फीचर्स चांगली असणारा आणि आपल्या बजेटमध्ये बसणारा फोन मिळणं अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टी चांगल्यात चांगल्या कोणत्या फोनमध्ये आहेत, ते शोधायचं. प्रत्येक फोनमध्ये कोणती ना कोणती उणीव असणारंच. आता गरजांनुसार फोन कसा घ्यायचा ते पाहू. या तिघांच्या गरजा आणि बजेट वेगवेगळं होतं. म्हणून मग खरेदी त्याप्रमाणे झाली.
पहिल्या मावशींच्या बाबतीत फोनचा वापर मर्यादित होता. कॉल्स घेणं – करणं, कधीकाळी ईमेल्स, परदेशातल्या नातवंडांसोबत वीक-एन्डला स्काईप आणि लेकासोबत अधल्या-मधल्या चॅटिंगसाठी व्हॉट्स अ ॅप . इतका मर्यादित वापर असेल तर मग फोनही तसाच शोधायला हवा. वय हा देखील तुमचा फोन घेतानाचा महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. म्हणून इथे आम्ही थोडा मोठा स्क्रीनवाला फोन घेतला. म्हणजे आयकॉन्स आणि फॉन्ट्स दिसायला – वाचायला टपटपीत. फोनचा इंटरफेस वापरायला सोपा हवा. वाय-फाय – ३जी कनेक्टिव्हिटी आणि निवडक अप्स डाऊनलोड करायला पुरेशी मेमरी स्पेस. ५ मेगापिक्सेलचा कॅमेराही पुरेसा. व्हिडिओज पाहणं, किंवा फार जास्त इंटरनेट सर्फिंग या फोनवरून होणार नव्हतं, म्हणून मग AMOLED किंवा Gorilla Glass स्क्रीनसाठी पैसे घालवण्यात अर्थ नाही.
347 mobils phone 34
दुसरी व्यक्ती होती नोकरी करणारी. ही व्यक्ती ब्लॅकबेरीवरून या नव्या टचफोनवर शिफ्ट होणार होती. सतत येणारे ईमेल्स, फोन कॉल्स, ऑन द गो चॅटिंग आणि मेसेजिंग, बाहेर जाताना लागणारं मॅप्स अप्लिकेशन, यूट्यूबचे व्हिडिओ पाहणं आणि डिसेंट कॅमेरा अशा इथे गरजा होत्या. फोनचा जास्तीत जास्त वापर इमेल्ससाठी होता. म्हणजे फोनचा प्रोसेसर आणि बॅटरीलाईफ चांगलं असायला हवं. व्हर्च्युअल कीपॅडचा वापर ईमेल्स टाईप करायला होणार म्हणजे तो किती वेल स्पेस्ड आहे तेदेखील महत्त्वाचं. म्हणजे त्यासाठी स्क्रीनसाईजही पुरेशी हवी.
तिसरी देखील नोकरी करणारी. ऑफिसमध्ये असतानाचे १०-१२ तास फोन तिच्या हातात आणि घरी आल्यावर तिच्या ३-४ वर्षांच्या लेकीच्या ताब्यात. इमेल्स कनेक्टिविटी हवीच. पण लेकीचे मूड्स टिपून ठेवण्यासाठी चांगला कॅमेरा हवा. शिवाय तिच्यासाठीची गाणी आणि इतर अप्लिकेशन्स आणि गेम्स डाऊनलोड करता यावेत म्हणून मग मेमरी स्पेसही महत्त्वाची. म्हणून फोन घेताना असा घेतला ज्याचा स्टिल कॅमेरा तर चांगला होताच पण ज्याने HD व्हिडिओजही शूट करता येतील. शिवाय लहान मुलाच्या हातात फोन असणार म्हणजे तो पडणं आलंच. म्हणून मग फोन घेताना असा घेतला की ज्याची बॉडी मजबूत असेल आणि पडण्याने बॅक कव्हरला लगेच तडा जाणार नाही.
फोन घेताना बजेटसोबतच या गोष्टीदेखील पाहणं महत्त्वाचं आहे. नुसतंच इम्प्रेस होऊन मोठी स्पेसिफेकेशन्स वाला फोन घेण्याऐवजी आपल्याला हवी तेवढ्या गोष्टी चांगल्यात चांगल्या पाहून घेणं महत्त्वाचं आहे. पहिल्याच फेरीत जाऊन फोन घेऊन येण्यापेक्षा एकदा मोठ्या स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला आवडलेला फोन हाताळून पहा. कारण अनेकदा इंटरनेटवरचे व्हिडिओ आणि कागदावरची स्पेसिफेकेशन्स पाहून हातात घेतलेला फोन आपल्याला आवडत नाही. त्यामुळे फोन हाताळून पहा. टाईप करायला, धरायला जमतंय का ते पहा. कॅमेरा क्वालिटी चेक करा आणि मगच तुमचा फोन विकत घ्या
 • Apple

  आवड…गरज आणि गॅजेट्स !!
  Well written original article, You are
  conveying clear message that buying decision should made on users likes, need
  & applications. I think budget & looks are also important. I like the
  way your are presenting the idea & comparing with getting perfect son in
  law I also like the way
  you have segmented them in A) Basic usage + Entertainment B) Business usage
  & C) Powerful ( Business +Entertainment) & mapped with different
  persona. You could have done more research on mobile user segmentation &
  buying behavior it would have more better…

 • Pratik

  You are right in many aspects.

  But many times we think that current specifications are enough for us and within 6 months or 1 year, the hardware configuration seems to be lacking. So my trend is to suggest people that get as much better hardware configurations as possible to avoid getting absolute and having to buy another phone in very few days.

 • umesh jadhav

  स्टीव जॉब्जचं असं मत होतं
  कि जो पर्यंत आपण लोकांना सांगत नाही तो पर्यंत त्यांना माहीतच नसतं कि त्यांना
  काय हवं आहे.लोकांची आवड आणि गरज ह्या गोष्टीना तो फार महत्व देत नसे त्यामुळे अॅपलचं प्रत्येक प्रोडक्ट हे त्याच्या
  भन्नाट कल्पना शक्तीचा अविष्कारच असे.सर्वात प्रथम तो प्रॉडक्ट डिझाईन करत असे आणि
  त्यानुसार प्रोडक्ट इंजीनीअरिंगचं काम सुरु होत असे.म्हणूनच अगदी नाविन्यपूर्ण
  उत्पादनं संगणक आणि मोबाईल क्षेत्रात येऊ
  शकली.याच्या अगदी उलट मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सचं.मार्केट रिसर्च वर त्याचा
  जास्त भर असे.विंडोज संगणक प्रणाली बाजारात आणण्या अगोदर त्याने शेकडो कंपन्यांना
  भेटी देऊन त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्यानुसार संगणक प्रणाली विकसित केली.अॅपलचं
  वैशिष्टय त्याच्या नाविन्यपूर्णतेत आहे तर मायक्रोसॉफ्टचं उत्पादन त्याच्या सहज
  सुलभ वापरासाठी प्रसिद्ध आहे.अॅपलची उत्पादनं लोकांना त्याच्या इनोवेशनमुळे आवडत
  असली तरी गरजा पूर्ण करण्यात तितकीशी सफल
  होताना दिसत नाहीत.कारण त्यातील कार्यप्रणाली ही केवळ त्या मशीन साठीच विकसित केली
  असल्यामुळे ग्राहकास जास्त पर्याय उपलब्ध राहत नाहीत.तर मायक्रोसॉफ्टमध्ये
  इनोवेशनचा अभाव आढळतो आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन गुगलने त्यांची
  अँड्रोईड कार्यप्रणाली विकसित केली जी कोणत्या ही स्मार्टफोनशी सुसंगत होऊ शकते
  आणि त्यामुळे ह्या क्षेत्रात जणू क्रांतीच झाली ग्राहकांना असंख्य पर्याय उपलब्ध
  होऊ लागले आणि तेही अगदी परवडणाऱ्या किमतीत.अॅपलच्या उत्पादनाची नक्कल करून त्याला
  मार्केट रिसर्चची जोड देऊन बऱ्याचशा कंपन्यांनी लोकांच्या गरजा आणि आवडी निवडींचा
  मेळ बऱ्याच प्रमाणात साधणारी उत्पादनं बाजारात आणली पण त्यांना आपण परिपूर्ण असं
  म्हणू शकत नाही.बडया कंपन्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीमुळे आणि छोटया कंपन्यांच्या
  तांत्रिक मर्यादांमुळे ग्राहकांना कधी हार्डवेअर तर कधी सोफ्टवेअर साठी कोम्प्रोमाईज
  करावा लागतो.

close