12 फेब्रुवारीला रास्ता रोको, हिंमत असेल तर रोखून दाखवा – राज

February 9, 2014 9:02 PM0 commentsViews: 6919

raj-thackeray_350_07241210412009 फेब्रुवारी : मंत्र्यांच्या घरात टोलचे पैसे जात असतील तर टोल का भरायचे ? टोल नाके फोडले त्याचं जे काही नुकसान झालं आहे ते भरणार नाही. येत्या 12 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात मनसे रास्ता रोको आंदोलन करणार आहे, या आंदोलनाचं नेतृत्व स्वत: मी करणार असून दम असेल तर रोखून दाखवा असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार दिलाय.

टोल फोड आंदोलनानंतर राज ठाकरे यांची बहुप्रतिक्षित विराट सभा पुण्यात पार पडली. यावेळी त्यांनी टोल नाक्यांच्या कारभाराचा पर्दाफाश करत सरकारवर हल्ला केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बिनपगडीचे मनमोहन सिंग आहे अशी बोचरी टीकाही राज यांनी केली.

‘ टोल देऊ नका, कुणी अडवलं तर तुडवा’ असा आदेश देऊन राज्यभरातील टोल तुटवून राज यांनी आता टोलविरोधात आंदोलन अधिक आक्रमक केले आहे. गेल्या आठवड्याभरापासून उत्सुक्ता ताणून धरलेली राज ठाकरेंची सभा अखेर आज (रविवारी) पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानावर पार पडली. यासभेला मनसेच्या कार्यकर्त्यांसह पुणेकरांनी तुफान गर्दी केली होती. मी निवडणुकीच्या प्रचाराचं नारळ फोडायला सभा घेतली नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्ट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

‘टोल नाही टोल वसुलीला विरोध’

माझा टोलला विरोध नाही, पण टोल कसा वसूल केला जातो याला माझा विरोध आहे. बहुतांश टोल नाके हे मंत्र्यांच्या आर्शीवादाने चालतात. त्यामुळे टोल नाक्याचे पैसे जर यांच्या घरात जात असतील तर मग सर्वसामान्यांनी टोल का भरायचा ? यांच्या निवडणुकीचा फंड वाढवण्यासाठी आम्ही टोल भरायचा का ? असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थित केला. जर असंच सुरू राहिलं तर उद्या सकाळपासून मंत्र्यांच्या गाड्या ‘चुन चुन कें’ फोडून काढू असा इशाराच राज यांनी दिला.

‘मुख्यमंत्री म्हणजे विनापगडीचे मनमोहन सिंग’

तसंच राज्यात अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे 13 टॅक्स आकारले जातात. त्यात हे सरकार टोलच्या रुपाने सामान्य जनतेवर 14 वा टॅक्स लादला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता यात भरडली जात आहे. या अगोदरही आम्ही टोल विरोधात आंदोलन केलं. कोर्टापर्यंत प्रकरण नेलं. पण कोर्टात ‘तारीख पै तारीख’चा खेळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडे गेला तर मुख्यमंत्री म्हणता आमचे हात बांधलेले आहे. मग टोल विरोधात न्याय कुणाकडे मागायचा ? राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे विनापगडीचे मनमोहन सिंग आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

‘टोल’फोडीची नुकसान भरपाई देणार नाही’

राज्यभरात जितके काही टोल नाके फोडले त्यांची नुकसान भरपाई देणार नाही. आणि का, म्हणून नुकसान भरपाई द्यावी ? मंत्र्यांच्या घरात पैसे जात असतील तर टोल नाक्याचे पैसे देणार नाही. येत्या 12 फेब्रुवारीला राज्यभरात टोल नाक्यांच्या विरोधात महाराष्ट्र नव निर्माण सेना रस्त्यावर उतरणार आहे. संपूर्ण राज्यात आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असून यांचं नेतृत्व मी स्वत: करणार आहे या सरकारमध्ये दम असेल तर मला पकडून दाखवा असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

 

close