‘मनसे’ची मान्यता रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका

February 10, 2014 5:56 PM0 commentsViews: 3893

Image img_190302_mns_240x180.jpg10 फेब्रुवारी :  राज्यभरात टोल नाक्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय. मात्र आता मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसे या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्याबरोबरच मनसेला निवडणूक लढवायला बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेत केली आहे.

या याचिकेवर 17 तारखेला सुनावणी होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात झालेल्या सभेत येत्या 12 तारखेला टोलविरोधात राज्यभरात रास्ता रोको करण्यात येईल अशी घोषणा केली होती त्याचं पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या उस्मानाबादमधल्या येणेगूर टोलनाकाच्या ठेकेदाराने टोलवसुली बंद केली आहे. या टोलची मुदत 2011 मध्ये उलटूनही टोलवसुली सुरूच होती, असं राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलं होतं. त्यानंतर आज या ठेकेदारानं हा टोलनाका बंद केला. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून या टोलनाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता तो हटवण्यात आलाय.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये टोलकर्मचार्‍यांनी टोलविरोधी कृती समितीला पाठिंबा दिला आहे. कोल्हापूरमध्ये 20 कर्मचार्‍यांनी टोलनाक्यावरील नोकरी सोडून टोलविरोधी कृती समितीच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. टोलविरोधी कृती समितीने या कर्मचार्‍यांचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर टोलविरोधी आंदोलनात कोल्हापुरामधून ‘आप’चे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत. टोलविरोधात आज ‘आप’चे कार्यकर्ते एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहेत.

close