शरद पवारांना एनडीएमध्ये यायचं होतं पण..-मुंडे

February 10, 2014 6:17 PM0 commentsViews: 1636

Image munde_on_pawar4334_300x255.jpg10 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालंय. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्यामुळे राजकीय चर्चा थांबायला तयार नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये यायचंय पण आपल्या विरोधामुळे त्यांना एनडीएमध्ये घेतलं जाणार नाही, असा दावा मुंडे यांनी रविवारी बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथल्या सभेत केला.

प्रत्येक निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि भाजपच्या जवळिकीच्या चर्चा होत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची 17 जानेवारीला दिल्लीत भेट झाल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनी त्याचं खंडन केलं. पुन्हा शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मोदींना भेटण्यात गैर ते काय असा सवाल केला.

आता शरद पवार यांनी एनडीएत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु आपण हे मान्य केल नाही अस भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी माजलगाव येथील सांगितलं. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नाही.असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ही चर्चा थांबायला तयार नाही. यामुळे राष्ट्रवादीला विशेषतः शरद पवारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत आहेत का हे बघावं लागवं लागणार आहे.

close