गोपीनाथ मुंडेंचं ‘प्रगतीपुस्तक’

February 10, 2014 8:38 PM0 commentsViews: 697

शशी केवडकर, बीड

भाजपची मुलुखमैदानी तोफ म्हणजे गोपीनाथ मुंडे समजले जातात. त्यामुळे मुंडेंचा मतदारसंघ असलेला बीड विशेष लक्षवेधी ठरतो. बीड मतदारसंघ जेवढा भाजपसाठी आणि मुंडेंसाठी महत्त्वाचा, तेवढाच, राष्ट्रवादीसाठी आणि पवारांसाठीही..याबद्दलच हा लेखाजोखा मुंडेंच्या बीड मतदारसंघाचा…

पवार-मुंडे वैर हा बीडच्या प्रत्येक निवडणुकीचा मुद्दा. मग ती निवडणूक ग्रामपंचायती असो वा लोकसभेची. भाजपतल्या राजकारणाने मुंडेंना दिल्लीत पाठवलं, पण मुंडे दिल्लीत रमलेच नाहीत. बीडकरांनी त्यांना तब्बल दीड लाख मताधिक्क्याने निवडून आणलं, पण बीडचे प्रश्न त्यांनी फारसे सोडवले नाहीत, ही त्यांच्याबद्दलची नाराजी..परळी- बीड -नगर या रेल्वेमार्गासाठीचा अतिरिक्त निधी हे मुंडेंचं मागच्यावेळचं आश्वासन होतं. तेही ते पूर्ण करू शकले नाहीत. अर्थात, खासदार निधीचा उपयोग मात्र त्यांनी पुरेपुर केला.

गोपीनाथ मुंडेंची कामगिरीवर

 • * खासदाराचे नाव – गोपीनाथ मुंडे
  * मतदारसंघाचे नाव – बीड लोकसभा मतदारसंघ
  * उपलब्ध निधी – 19 कोटी रुपये
  * मंजूर निधी – 16 कोटी रुपये
  * खर्च केलेला निधी – 11 कोटी रुपये
  * खासदार निधीचा एकूण वापर – 93 %

सभागृहात विचारलेली प्रश्नसंख्या

 • * स्वतंत्रपणे: 10
  * संयुक्तपणे: 27
  * एकूण: 37

मुंडेंनी बीडचा त्यांचा किल्ला एकदम भक्कम केलाय. यावेळी तर राष्ट्रवादीने थेट घरात घुसून त्यांच्या किल्ल्याला खिंडार पाडलं. पण त्यांचा बुरूज ढळला नाही. मुंडेंसमोर राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाहीए, यातच सारं आलं. बळीचा बकरा बनणार कोण? बीडमधले राष्ट्रवादीचे सगळे नेते तू तू मैं मैं करत आहेत. खुद्द राष्ट्रवादीचे माजी मंत्रीही मुंडेंना सामोरं जायला तयार नाहीत.

मुंडेंना बीडमध्ये गुंतवण्याचा, आव्हान देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न अजून तरी यशस्वी झालेला नाही. मुंडेंही राज्यासोबत बीडचे तालुके पिंजून काढत आहेत. गेल्या वेळी त्यांचं मताधिक्य होतं दीड लाखांचं. यावेळी ते किती असणार एवढाच प्रश्न बाकी आहे.

close