राज ठाकरेंना जमावबंदीची नोटीस

February 11, 2014 2:16 PM0 commentsViews: 1889

346 raj 436534611 फेब्रुवारी : “येत्या 12 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करणार असून सरकारमध्ये हिंमत असेल तर अडवून दाखवा” असं आव्हान देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जमावबंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या राज्यभरात रास्ता रोको करण्यासाठी मनसेसैनिक रस्त्यावर उतरणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रस्त्यावर उतरणार आहे.

मात्र मनसेसैनिकांप्रमाणे राज ठाकरे यांनाही पोलिसांनी कलम 149 अंतर्गत जमावबंदीची नोटीस बजावली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या सभेत राज यांनी 12 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्या अगोदर राज यांच्या आदेशावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात टोल फोड केली होती.

त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी अगोदर बंदोबस्त करायला सुरूवात केली. सोमवारी राज्यभरातील मनसैनिकांनी पोलिसांनी जमावबंदीच्या नोटीसा बजावल्या आहे. टोल नाक्यांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, उद्याच्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसेचे सगळे आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक घेतली. उद्याच्या आंदोलनासंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली. संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

close