रास्ता रोको होणारच -राज ठाकरे

February 11, 2014 9:17 PM0 commentsViews: 5162

Image raj_on_toll_news_300x255.jpg11 फेब्रुवारी : टोल नाक्यांविरोधात उद्या रास्ता रोको आंदोलन होणारच आणि खणखणीत होणार आहे, उद्या सकाळी 9 वाजेपासून
राज्यातील जी महामार्ग टोलने बरबटलेली आहे ते महामार्ग बंद राहतील आणि यानंतर 21 फेब्रुवारीला गिरगाव चौपाटी ते मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे स्वत: वाशी टोलनाक्याजवळ आंदोलनात सहभागी होणार आहे. तसंच हे आंदोलन शांतेत होईल. कुठेही तोडफोड होणार नाही, निषेध म्हणून हा रास्ता रोको आहे. या आंदोलनातून गरजेच्या सोयी सुविधा वगळण्यात आल्या आहे. जरी कुणाला यामुळे त्रास होत असेल तर त्याबद्दल मी आताच दिलगिरी व्यक्त करतो असंही राज म्हणाले. आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेऊन राज यांनी आंदोलनावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

सरकारचा विनंती धुडकावली

‘येत्या 12 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करणार असून हिंमत असेल तर अडवून दाखवा’ असं थेट आव्हान राज ठाकरे यांनी सरकारला दिलं होतं. आंदोलनावर ठाम राहात उद्या हायवे जाम होणारच असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्याशी संपर्क संबंध साधण्यात आला. आंदोलन स्थगित करावं अशी विनंती करण्यात आली. पण याअगोदर चार वेळा टोलबाबत चर्चा झाली पण तोडगा काहीही निघाला नाही. त्यामुळे या सरकारवर विश्वास नाही. उद्या ठरल्याप्रमाणे आंदोलन होणारच आहे. ज्या ज्या महामार्गांवर टोल नाके आहे ती महामार्ग बंद करण्यात येतील असं राज यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरे स्वत: वाशी टोलनाक्यावर आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे.

शहरांची व्यवस्था सुरळीत सुरू राहील

बारावीच्या परीक्षांचे प्रॅक्टिकल सुरू आहे. इतरही गोष्टी आहे त्यामुळे राज्यातील प्रमुख शहरं ठाणे असेल, पुणे असेल नाशिक असेल या शहरांची व्यवस्था कोलमडणार नाही. ज्या परीक्षा आहे त्या सुरळीत पार पडतील. कॉलेजस बंद ठेवण्याची गरज नाही. शाळा बंद ठेवायची गरज नाही. पण महाराष्ट्रातील प्रमुख हायवे जे टोल ने बरबटलेले आहे ते उद्या सकाळपासून बंद राहतील. जे करतोय हा लोकांना त्रास कमी होण्यासाठी करतोय. त्यामुळे ज्यांना कुणाला त्रास होत असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मला माफ करावे असं राज म्हणाले.

तोडफोड होणार नाही

प्राथमिक स्वरुपाचं उद्याचं आंदोलन असणार आहे. जर सुप्रिया सुळे यांनी म्हटलं असेल ‘एसटी बसेस फोडू नका, मंत्र्यांच्या गाड्या जाळा’ तर असं काही होणार नाही. कुठेही नासधूस होणार नाही. फक्त निषेध म्हणून हा रास्ता रोको असणार आहे. आणि तो खणखणीत असणार आहे हे निश्चित. त्यानंतर 21 फेब्रुवारीला गिरगाव चौपाटी ते मंत्रालय असा मोर्चा काढणार आहे. जर या दरम्यान सरकारला जाग आली तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत.

दरोडेखोरांशी काय चर्चा करायची ?

दरोडेखोरांशी टोलवर काय चर्चा करायची ? चर्चा करायची तर मुख्यमंत्र्यांनी करावी, संबंधित अधिकार्‍यांनी करावी, माझा ज्यांच्यावर आक्षेप आहे, ज्यांच्यावर पैसे खाण्याचा आरोप आहे त्यांच्याशी का चर्चा करावी ?, त्यामुळे भुजबळांनी हे सांगू नये असं प्रत्युत्तर राज यांनी भुजबळांना दिलं.

 

close