मनसेसैनिक उतरले रस्त्यावर

February 12, 2014 10:11 AM0 commentsViews: 9896

MNS workers vandalise toll booths (31)12 फेब्रुवारी : राज्यातील टोलने बरबटलेले महामार्ग बंद करण्यासाठी आज सकाळपासून मनसेसैनिक रस्त्यावर उतरले आहे. मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे इथं मनसे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय. ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहे. ठाण्यातल्या खारेगाव टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी रास्तारोको करून नाशिक हायवे बंद करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी कळवा पोलिसांनी 50 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय. जवळपास 20 मिनिटं हा रास्ता रोको सुरू होता. नवी मुंबई, वाशीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन केलं. या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर माती टाकून आंदोलन केलं. तर नागपूरमध्ये मनसेचे पूर्व विदर्भाचे संघटक हेमंत गडकरी यांना ताब्यात घेण्यात आलंय.

तर दुसरीकडे नाशिकमध्ये पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. टोलविरोधी आंदोलनासाठी रास्ता रोको करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले. मनसेच्या महिला शहराध्यक्ष सुजाता ढेरे यांनी विल्लोळीजवळ रास्ता रोकोचं नेतृत्व केलं. या रास्तारोकोमुळे नाशिक मुंबई हायवे जाम झाला. दरम्यान, नाशिकचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार वसंत गीते यांना ताब्यात घेण्यात आलं. जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

पुणे परिसरात मनसेचं आंदोलन शांततेत सुरू आहे. खेड शिवापूर टोल नाक्यावर तोडफोडीच्या भीतीने वसुली बंद आहे. आतापर्यंत पुण्यात 50 हून अधिक लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापूर्वी चांदणी चौकात मनसे कार्यकर्त्यांनी वाहनांची टायरमधली हवा काढली. मनसे माजी नगरसेवक राज गोर्डे यांच्यासह 10 जणांना अटक करण्यात आली. वारजे पोलिसांनी ही कारवाई केलीये. दरम्यान, मनसेचे माजी नगरसवेक राज गोर्डे यांच्यासह 10 कार्यकर्त्यांना ताब्यात आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार खानिवडे टोल नाक्यावर रात्री पासूनच पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय. वसई तालुक्यात खानिवडे येथील एकच टोल नाका असल्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. यात 10 अधिकारी,70 पोलीस,20 जवानांचं एक दंगल नियंत्रण पथक असा 100 च्यावर पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात केलाय. तालुक्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना 151 च्या कलमान्वये कारवाई करुन 33 जणांना पोलिासांनी ताब्यात घेतलंय. तर 70 जणांना 149 नुसार नोटीस बजावल्या आहेत.

close