गांधीजींच्या वस्तूंच्या लिलावाला कोर्टाची स्थगिती

March 4, 2009 5:58 PM0 commentsViews: 4

4 मार्च, नवी दिल्लीन्यूयॉर्कमध्ये होणार्‍या गांधीजींच्या वस्तूंच्या लिलावाला दिल्ली हायकोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळे गांधीजींच्या वस्तू भारतात आणायला सरकारला पुरेसा वेळ मिळणार आहे. अहमदाबादमधल्या नवजीवन ट्रस्टनं हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टानं हे आदेश दिलेत. 1996 मध्येही मद्रास हायकोर्टानं अशाच प्रकारचे आदेश दिले होते. त्यामुळे लंडनमध्ये होणार्‍या गांधीजींच्या हस्तलिखितांचा लिलाव रोखायला मदत झाली होती. गांधीजींच्या वस्तू भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करेल, असं भारताचे न्यूयॉर्कमधले कॉन्सल जनरल प्रभू दयाल यांनी म्हटलंय. सीएनएन-आयबीएनला त्यांनी दिलेल्या खास मुलाखतीत ही माहिती दिली. एनआरआय हॉटेल व्यावसायिकांनी आता गांधीजींच्या वस्तू मायदेशी पाठवण्यासाठी पुढाकार घेतलाय. न्यूयॉर्कमधल्या लिलावात भाग घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. लिलाव जिंकल्यानंतर गांधीजींच्या वस्तू ते भारत सरकारला भेट देणार आहेत. संत चटवाल हे या हॉटेल व्यावसायिकांचं नेतृत्व करत आहेत. गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी या वस्तू परत आणण्यासाठी निधी जमा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. आता सरकारनं तात्काळ यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणी त्यांनी केलीय.

close