काय होणार जनलोकपाल विधेयकाचं?

February 14, 2014 2:43 PM0 commentsViews: 197

DELHI_ASSEMBLY_1739449f14 फेब्रुवारी :  दिल्लीमध्ये आज (शुक्रवार) अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (आप) सरकार बहुप्रतिक्षीत जनलोकपाल विधेयक मांडण्याची अटकळ बांधली जात असतानाच दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी विधानसभा अध्यक्षांना हे विधेयक मांडण्याची परवानगी नाकारण्याचे आवाहन केले.

या विधेयकासंदर्भात “योग्य ती घटनात्मक प्रक्रिया’ पार पाडण्यात न आल्याने हे विधेयक विधानसभेत मांडण्याची परवानगी नाकारण्याचे आवाहन नायब राज्यपालांनी यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केले आहे. केंद्राने या विधेयकाला मंजुरी दिलेली नाही, त्यामुळे जनलोकपाल विधेक मांडू नये असं मत जंग यांनी या पत्रात मांडलं आहे.

तर दुसरीकडे, दिल्लीमध्ये आप सरकारने घटनात्मक पद्धतीने जनलोकपाल विधेयक विधानसभेत मांडल्यास, त्याला काँग्रेस पाठिंबा देईल असं दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अरविंदर सिंग लवली यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. नेटवर्क 18ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विधेयक मांडावे की नाही याबद्दल विधानसभेतच मतदान घेतलं जाईल. या मतदानात सरकारचा पराभव झाला तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजीनामा देतील असंही या सूत्रांनी सांगितलं आहे.  या पार्श्‍वभूमीवर या विधेयकासंदर्भात व केजरीवाल यांच्या पुढील भूमिकेसंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, जनलोकपाल विधेयक मांडण्यासाठी केंद्रीय गृहखात्याची परवानगी आवश्यक असण्यासंबंधीचा गृहखात्याचा नियम बदलण्यात यावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका दिल्ली हायकोर्टात सादर करण्यात आलीये.  तर, आपला आणि आपल्याला निधी पुरवणार्‍यांचा भ्रष्टाचार उघडकीला येईल या भीतीने काँग्रेस आणि भाजप जनलोकपाल विधेयकाला विरोध करत आहेत, असा आरोप ‘आप’चे नेते आशुतोष यांनी केला आहे. तसंच काँग्रेस आणि भाजप एकत्रितपणे काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

close