फिल्म रिव्ह्यु : गुंडे

February 15, 2014 5:54 PM0 commentsViews: 1296

अमोल परचुरे, समीक्षक

गुंडे… शोकेसमधील गोष्टी बघून आपण दुकानात शिरावं आणि आतमध्ये जाऊन बघावं तर सगळा जुनाच माल…गुंडेचं अगदी तसंच झालंय… झकास प्रोमो बघून सिनेमाबद्दल अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, पण प्रत्यक्षात लांबण लावलेला, जुनाच मसाला ठासून भरलेला सिनेमा बघायला मिळाला. दोन्ही हिरो हे खूप जोशपूर्ण असल्यामुळे सिनेमात स्टाईल आहे, चमचमीत डायलॉगबाजी आहे, दोन नायक-एक नायिका असा प्रेमाचा त्रिकोण आहे, तुफान ऍक्शन आहे, इरफान खान सारखा तोडीस तोड पोलीस आहे. थोडक्यात, सुपरहिट सिनेमासाठी जे जे आवश्यक असतं ते सगळं आहे, पण तरीही सगळा मामला फसल्यासारखा वाटतो. सुरुवात झाल्यावर असं वाटतं की, पुढे जाऊन चांगला संघर्ष बघायला मिळणार आहे, पण प्रत्यक्षात घिसीपीटी स्टोरी आणि प्यार-दोस्तीचा मेलोड्रामा बघावा लागतो.

काय आहे स्टोरी ?
gundey45
बिक्रम आणि बाला हे दोन गुंडे…बांग्लादेशची निर्मिती झाल्यावर हे दोघे निर्वासित कलकत्त्यात (आताच कोलकाता) पळून येतात आणि इथे अवैधपणे राहायला लागतात. गुंडपणा लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये भिनतो, कोळशाचा काळाबाजार करायला ते सुरुवात करतात आणि हळूहळू संपूर्ण कलकत्ता शहरच त्यांचं साम्राज्य बनतं. त्यांच्या मागावर असतो एसीपी सत्यजित सरकार..दरम्यान, बिक्रम आणि बाला दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडतात आणि हे प्रेमच त्यांच्यामध्ये दीवार बनतं.

gs4-jan9

मग दोस्ती दुश्मनीमध्ये बदलते आणि नंतर बरंच कायकाय घडतं. इंटरव्हलच्या आधी काही चांगले ट्विस्ट आहेत पण इंटरव्हलनंतर नुसतीच डायलॉगबाजी आणि हाणामारी सुरू राहते. सिनेमा संपत असताना मनात विचार येतो की, कलकत्ता शहर, बांग्लादेशची निर्मिती या सगळ्याचं नेमकं काय प्रयोजन होतं. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’मध्ये जे काही घडलं होतं तेच थोड्याफार फरकानं दाखवण्यासाठी लोकेशन बदललं असावं.

परफॉर्मन्स
246irfan
सामान्यत: हिरो-हिरोईनची केमिस्ट्री सिेनमात महत्त्वाची ठरते, पण ‘गुंडे’मध्ये रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. बरं, एकमेकांच्या संमतीने एकाच मुलीवर लाईन मारणं हा प्रकारसुद्धा पहिल्यांदाच हिंदी सिनेमात आला असेल. हा ट्रॅक नंतर टिपिकल बनत असला तरी इंटरव्हलआधी दोघांच्या केमिस्ट्रीने बरीच मजा येते. प्रियांका चोप्राने हिरॉईन जे करतात ते व्यवस्थित केलंय, पण रणवीर -अर्जुनपेक्षाही भाव खाल्लाय इरफान खानने..दोनही हिरोंपेक्षा तो उठून दिसलाय आणि अभिनयात तर तो लाजवाब आहेच. एकंदरित, ब्लॉकबस्टर सिनेमा बनवल्याचा आभास यशराजने निर्माण केलाय, पण प्रत्यक्षात नव्या बाटलीत जुनीच दारू भरलेली आहे.

रेटिंग – 100 पैकी 50

close