दिल्लीत राष्ट्रपती राजवट

February 15, 2014 9:18 PM0 commentsViews: 617

kejriwal15 फेब्रुवारी : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने राजीनामा दिल्यानंतर आता दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केली आहे. त्याचबरोबर विधानसभा भंग करण्याची शिफारसही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केलीय. राज्यपालांपाठोपाठ केंद्रीय मंत्रिमंडळानेही राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली.

दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यात राष्ट्रपती राजवटीवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. आप सरकार बरखास्त झाल्यामुळे दिल्ली विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकणार्‍या भाजपला सत्ता स्थापन करण्यास विचारणा करण्यात आली पण भाजपनं सत्ता स्थापन करायला नकार दिलाय. त्यामुळे दिल्ली राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

जनलोकपाल विधेयक मांडू दिलं नाही म्हणून अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जनलोकपाल विधेयक हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते. पण भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केल्यामुळे जनलोकपाल मांडू दिले नाही असा आरोप केजरीवाल यांनी केला. सत्तेसाठी 100 वेळा राजीनामा देईल असं सांगत केजरीवाल यांनी राजीनामा देऊ केला. केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यामुळे दिल्लीत सत्तेचा पेच पुन्हा निर्माण झाला. दिल्ली विधानसभेत 32 जागा जिंकूनही भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिलाय.

 

close