राज्यात दोन्ही काँग्रेस आणि सेना-भाजपमध्ये मैत्री कायम

March 5, 2009 4:53 AM0 commentsViews: 4

5 मार्च काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा घोळ आता जवळपास सुटल्यात जमा झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस 25 तर राष्ट्रवादी 23 जागा लढवणार आहे. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चार बैठका होऊनही सात ते आठ जागांवर एकमत होऊ शकलं नव्हतं. शेवटी या जागांचा मुद्दा दोन्ही पक्षांच्या हायकमांडवर सोडण्यात आला. बुधवारी रात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसच्या वतीनं ए. के. ऍन्टोनी, अहमद पटेल आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत 25-23 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतंय. आता जागावाटपासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दिल्लीत बैठक होतेय. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे दिल्लीला गेलेत. आत्तापर्यंत काँग्रेस 25 राष्ट्रवादी 23 जागा लढवणार असं नक्की झालं आहे. मात्र याची औपचारिक घोषणा गुरुवारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना-भाजप युतीत 22 आणि 26 अशा जागावर एकमत झालं आहे. आता युतीबाबतची अधिकृत घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करतील असं मनोहर जोशी यांनी सांगितलं. आता येत्या दोन दिवसांत युतीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

close