युपीए मांडणार तेलंगणा विधेयक,मुख्यमंत्री रेड्डी देणार राजीनामा?

February 18, 2014 9:28 AM1 commentViews: 281
telangana18 फेब्रुवारी : सीमांध्रच्या नेत्यांकडून तीव्र विरोध होत असतानाही आंध्र प्रदेश विभाजनाचे तेलंगणा विधेयक आज (मंगळवारी) लोकसभेत चर्चेला घेण्याची जय्यत तयारी केंद्र सरकारने केली आहे. पण सभागृहात या मुद्यावरुन सुरु असलेल्या प्रचंड गोंधळामुळे ही चर्चा व्यवस्थित पार पडेल याबद्दल अनेकांच्या मनात शंकाच आहे.
तेलंगणाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये गोंधळामुळे कामकाजात सतत अडथळे येताहेत. यामुळे कामकाज सकाळपासून तहकूब होतंय. आता लोकसभेचं कामकाज 3 तर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. थोड्या वेळापूर्वी गोंधळातच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेत तेलंगणाचं विधेयक मांडलं. गुरुवारीही प्रचंड गोंधळात सरकारनं लोकसभेत तेलंगणा विधेयक मांडलं होतं. पण इतक्या गोंधळात मांडलेल्या विधेयकाला भाजपनं तांत्रिक कारणावरून विरोध केला होता. त्यामुळे आज पुन्हा एकदा विधेयक मांडण्यात आलं. पण गोंधळ सुरुच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज आधी पाऊण आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
आज सकाळी 11 वाजता कामकाज सुरु झाल्यापासून दोन्ही सभागृहांमध्ये तेलंगणाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरु होता. आधी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 12 वाजता कामकाज सुरु झाल्यानंतरही गोंधळ सुरुच राहिला. त्यातच तेलंगणा विधेयक मांडण्यात आलं. मात्र, गोंधळामुळे कामकाज तहकूब करण्याशिवाय अध्यक्ष मीरा कुमार यांच्यासमोर पर्याय नव्हता. राज्यसभेतही कामकाज 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलंय.
मुख्यमंत्री रेड्डी देणार राजीनामा?
लोकसभेत तेलंगणा विधेयक पास झालं तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किऱण कुमार रेड्डी राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. तेलंगण राज्यनिर्मितीचे कट्टर विरोधक असलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी हे राज्य विभाजनाच्या निषेधार्थ काँग्रेसमधून बाहेर पडून नवीन राजकीय पक्ष स्थापणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहेत.
भाजपची मागणी
13 फेब्रुवारी रोजी अभूतपूर्व गोंधळात तेलंगण निर्मितीचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आहे. या गोंधळानंतर आंध्र प्रदेशमधल्या 42 पैकी 17 खासदारांचं निलंबन झालेलं आहे. हे सर्व खासदार सींमांध्र भागातले आहेत . या खासदारांचं निलंबन मागे घ्यावं आणि चर्चेला सुरवात करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येण्याची शक्यता आहे .
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
दरम्यान, दिल्लीमध्ये या चर्चेच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. संसद भवन, सर्व महत्त्वाची सरकारी कार्यालयं आणि महत्त्वाच्या नेत्यांचे बंगले या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीयत . तेलंगणा विधेयकाच्या निमित्ताने आंध्रच्या राजकारणातले तीन प्रभावी गट दिल्लीमध्ये तीव्र स्वरुपाचं आंदोलन करण्याची शक्यता आहे. यामध्ये तेलंगणा समर्थकांचा एक गट आणि तेलंगणा विरोधकांमध्ये जगन रेड्डी आणि चंद्राबाबू नायडू यांचे एकएक गट आंदोलनाच्या तयारीत आहेत.
काँग्रेसची जय्यत तयारी
लोकसभेत तेलंगणाच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला असून आठवडाभर लोकसभेत हजर राहून सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकसभेत एकदा लेखानुदान मंजूर झाले की केंद्र सरकारचे सर्व लक्ष आंध्र प्रदेश विभाजन विधेयक मंजूर करवून घेऊन तेलंगण निर्मितीवर केंद्रित होणार असल्याचे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. सीमांध्रच्या नेत्यांनी तेलंगण निर्मितीला तीव्र विरोध करूनही काँग्रेस हायकमांडने त्याची दखल न घेता पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
  • Bhushan jog

    समाज म्हणून भारतीय लोक एक गलिछ मनोव्रुत्तिचे लोक आहेत. प्रत्येक जिल्हा एक राज्य म्हणून निर्माण झाला तरी भारतीय लोक प्रगती करु शकणार नाही कारण ज्यांच्या रक्तातच लुटपाट बईमानि आहे ते लोक असेच वागणार जसे आता वागत आहेत.

close