गडकरींनी केजरीवालांविरोधात ठोकला अब्रुनुकसानीचा दावा

February 18, 2014 7:07 PM0 commentsViews: 1254

gadkari on kejri18 फेब्रुवारी : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या भ्रष्ट नेत्यांची यादी आता त्यांनाच महागात पडण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केजरीवाल यांच्या विरोधात कोर्टाचे दार ठोठावले आहे. या आपच्या भ्रष्ट यादीविरोधात गडकरी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. याबाबत दिल्लीतल्या पटियाला कोर्टात गडकरींनी याचिका दाखल केली आहे.

मागील महिन्यात केजरीवाल यांनी तावातावाने देशातील भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद मोदी यांचाही समावेश आहे. या यादीत मोदींच्या पाठोपाठ भाजपच्या गोटातून नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्ट नेत्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता.

या नेत्यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असंही त्यांनी जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे ‘आप’ने या अगोदर गडकरींच्या पूर्ती कंपनीत गैरव्यवहार असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांना आपले राष्ट्रीय अध्यक्षपद सोडावे लागले होते. आता मात्र ‘आप’ने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्ट नेते म्हणून यादी जाहीर केल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी आपविरोधात दंड थोपटले आहे. या अगोदर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केजरीवाल यांनी आरोप सिद्ध करुन दाखवावे असं जाहीर आव्हान दिलं होतं. आता गडकरी यांनी थेट केजरीवाल यांना कोर्टातच खेचले आहे.

close