अण्णांचा केजरीवालांना नकार, ममतादीदींना पाठिंबा

February 19, 2014 5:41 PM0 commentsViews: 1368

anna and mamta19 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे अण्णांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय. तसंच आपण नरेंद्र मोदी यांनाही पाठिंबा देणार नाही असंही अण्णांनी स्पष्ट केलंय. अण्णा हजारे आणि ममता बॅनर्जी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाठिंब्यांची घोषणा केली.

यावेळी अण्णांनी काळा पैसा देशात परत आणला गेला पाहिजे आणि सत्ता परिवर्तनापेक्षा व्यवस्था परिवर्तन महत्वाचे आहे असंही अण्णा म्हणाले. केजरीवाल यांना जे 17 प्रश्न विचारले होते ते 17 मुद्दे ममतादीदींना मंजूर आहे. म्हणून त्यांना पाठिंबा देण्यात आला. पण व्यक्ती आणि पक्ष म्हणून पाठिंबा नाही तर देशहिताच्या भूमिकेतून पाठिंबा दिलाय असं अण्णांनी स्पष्ट केलं.

तसंच मी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणार नाही आणि विरोधही करणार नाही असंही अण्णा म्हणाले. तर ममतादीदींनी अण्णांची आभार मानत केंद्र सरकारवर टीका केली. केंद्राची भूमिका केवळ राज्यांकडून कर वसूल करणे इतपत मर्यादीत आहे का? असा सवाल ममतादीदींनी उपस्थित केला. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत उमदेवारांची निवड करताना अण्णांचं मार्गदर्शन घेणार असंही ममतादीदींनी सांगितलं.

close