राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची सुटका लांबली, 6 मार्चपर्यंत स्थगिती

February 20, 2014 1:06 PM0 commentsViews: 310

rajivgandhiassa__161270058920 फेब्रुवारी : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी दोषी मारेकर्‍यांची सुटका लांबली असून तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने 6 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. तमिळनाडु राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. अटर्नी जनरल यांनी याबाबत याचिका दाखल केली असून, तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याच्या निर्णयाला विरोध केला.  मारेकर्‍यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राचा असून राज्य सरकारचा नाही, असे केंद्राचे म्हणणे आहे.

तर दुसरीकडे, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. राजीव गांधींवरचा हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर हल्ला होता. राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची सुटका करण्याचा तामिळ नाडू सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. आणि त्याची अंमलबजावणी होता कामा नये. दहशतवादाबाबत कोणतंच सरकार किंवा पक्षानं मवाळ धोरण स्वीकारता कामा नये, असं मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सातही मारेकर्‍यांची सुटका करण्याचा आदेश बुधवारी तामिळनाडू सरकारने काढला होता. मुख्यमंत्री जयललिता यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला. पण, सुटकेआधी केंद्र सरकारचे मत घेतले जाईल, असेही राज्याने ठरवले. मात्र तीन दिवसांत त्यावर उत्तर आले नाही तर सर्व दोषींची सुटका केली जाईल, असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तीन मारेकरी संथान, मुरुगन, पेरारीवलन  यांची फाशीची शिक्षा माफ केली. नलिनी, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन 22 वर्षांपासून वेल्लोर व मदुराईच्या तुरुंगात आहेत.
दरम्यान, तामिळनाडू सरकारच्या निर्णयावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. एका पंतप्रधानाला न्याय मिळत नसेल, तर गरिबाला कुठून न्याय मिळेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

close