तेलंगणात पुन्हा नक्षलवाद्यांचं ‘लाल निशाण’?

February 20, 2014 6:36 PM1 commentViews: 272


महेश तिवारी, हैदराबाद

20 फेब्रुवारी : स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीला विरोध करणार्‍यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो नक्षलवादाचा. एकेकाळी तेलंगणा हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला होता. माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या कारकिर्दीत माओवाद्यांच्या कारवायांना पायबंद घालण्यात मोठ्या प्रमाणात यश आलं होतं. आता स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर ही समस्या पुन्हा उग्र होईल अशी भीती व्यक्त केली जातेय.

पश्चिम बंगालमधल्या नक्षलबाडीमध्ये नक्षलवादी चळवळीचा उगम झाला असला तरी खर्‍या अर्थाने ही चळवळ रुजली ती
तेलंगणामध्ये. भौगोलिकदृष्ट्या विचार करता, नक्षलवाद्यांच्या दृष्टीकोनातून तेलंगणाचे स्थान महत्त्वाचं आहे. इथूनच ही चळवळ महाराष्ट्रात आणि सध्याच्या छत्तीसगढमध्ये पसरली. इथले करीमनगर आणि आदिलाबाद हे जिल्हे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना लागून आहेत. तेलंगणामधल्या वारंगल, निजामाबाद या जिल्ह्यांमध्येही नक्षलवाद्यांचा हिंसक कारवाया व्हायच्या. माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांनी नक्षलवाद्यांच्या बिमोडासाठी पावलं उचलली. आता तेलंगणामधल्या 10 पैकी 2 ते 3 जिल्ह्यांमध्येच नक्षलवाद उरले आहेत.

तेलंगणात बसलेल्या धक्क्यांनी हादरलेल्या नक्षलवाद्यांनी स्वतंत्र तेलंगणाला पाठिंबा जाहीर केला. तसंच आंदोलनामध्येही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्यामुळे उस्मानिया विद्यापीठ परिसरासह अनेक ठिकाणी झालेल्या आंदोलनांना हिंसक वळण लागलं. सुरक्षा दलांनीही त्याची दखल घेतलीये. स्वतंत्र राज्य झाल्यास, तेलंगणा नक्षलवाद्यांच्या हातात जाईल, अशी भीती सुरक्षा दलाचे अधिकारी वर्तवत आहेत. तेलंगणा समर्थकांना मात्र अर्थातच हे मान्य नाही.

एकीकडे देशभरात स्वत:च्या कारवाया वाढवण्यात नक्षलवाद्यांना यश येत असताना, एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या तेलंगणामधला त्यांचा पाया डळमळीत झाला आहे. तो मजबूत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे स्वतंत्र तेलंगणाचा त्यांना लाभ होतोय की, नाही ते समजण्यासाठी काही काळ जावा लागेल.

 तेलंगणाच्या निर्मितीसाठी नक्षलवाद्यांच्या चळवळी

– नक्षलवाद्यांसाठी तेलंगणाचं भौगोलिक स्थान महत्त्वाचं
– तेलंगणामधून नक्षल चळवळीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये प्रसार
– करीमनगर आणि आदिलाबाद जिल्हे गडचिरोली आणि चंद्रपूरला लागून
– वारंगल, निजामाबाद जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव

  • ANiket

    kahi fayda nahi vegla houn choti rajya tase hi khdyat janar…nidan he dhoke maharashtra ne lakshat gheun vegla vidarbha chi magni karnaryana ata ch aat takav ani tyanchi tonda band karavi nahi tar ikde pan hech honar ani he ugrawadi ikde pan vaat lavnar…hyancha dhoka sagalya ch chotya rajyana ahe ani tyachi barich udharna pan ahet ch mhanun choti rajya nako.

close