मराठी माणूस पंतप्रधान का नाही? – नाना

February 23, 2014 12:43 PM2 commentsViews: 2324

Nana patekar23 फेब्रुवारी :  गेल्या साठ वर्षात महाराष्ट्रातून पंतप्रधानपदासाठी एक माणूस तयार होऊ शकला नाही. याचं मला फार वाईट वाटतंय, अशी खंत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलीय. आपण ताकतवान असूनसुध्दा स्वत:ला रेटून पुढे जाण्याची शक्ती आपल्यात नाही, शिवाय महाराष्ट्रातील नेत्यांच्यातील अतिशालीनता ही कुठे तरी त्यांना मागे राहण्यास कारणीभूत ठरते, असं मत नाना पाटेकरांनी व्यक्त केल.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील नानासाहेब सांगरे सहकारी दुध संघाच उद्घाटन काल शनिवारी नाना पाटेकर यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री आर.आर.पाटील होते.

रांगड्या नानांची झक्कास एन्ट्री आणि राजकारणावर शेलक्‍या शब्दांत केलेल्या टिप्पणीला कवठेमहांकाळकरांनी जोरदार दाद दिली. पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देताना नानाने आपण तेथे साठ दिवस राहिलो, त्यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांनी मदत केल्याचे सांगितले. शरद पवार यांचे नाव निघताच तो धागा नानाने पंतप्रधानपदाशी नेऊन जोडला. “गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्रातील एकही पंतप्रधान झाला नाही, आपण पंतप्रधानपदासाठी ताकद लावली पाहिजे, रेटले पाहिजे.” असं ते म्हणाले.

भ्रष्ट नेत्यांना जाब विचारा
राजकारण्यांवर टीका करताना पाटेकर म्हणाले, निवडणुकीआधी सामान्य असलेले उमेदवारांची मालमत्ता चौपट होते. त्याच्याकडे एवढी मालमत्ता येते कोठून, याचा जाब लोक विचारत नाहीत. त्यामुळेच त्यांना रान मोकळे मिळते आणि भ्रष्टाचार बोकाळतो. जनतेने अशा नेत्यांना जाब विचारायला हवा असे सांगून नाना पाटेकर पुढे म्हणाले , नेते असूनही आर. आर. पाटील हे गुणवान आणि सरळ मार्गी आहेत. आबांसारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्यांच्या पाठीशी लोकांनी राहिले पाहिजे, शिवाय त्यांनी तर तंबाखूसुध्दा सोडलीय, असे सांगत नाना यांनी आबांना चिमटे काढले
  • umesh jamsandekar

    नाना तुम्हाला राजकारणात रस नसला तरी राजकारणातल बरंच कळत. माझी आपणास प्रामाणिक विनंती आहे हे राज्य खऱ्या अर्थाने लोक कल्याणासाठी चालावं अस आपणास वाटत असेल तर आपण येणाऱ्या पिढीला प्रामाणिक राजकीय शिक्षण द्यावं. आज निर्भीडता आणि प्रामाणिकता ह्या गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत पण त्या तुमच्याकडे आहेत त्या या भावी पिढीला दान करा अशी मागणी करीत आहे.

  • Rahul Ahire

    Tumchya Margdarshanacha Aamhala khup upyog hoel Nana Saheb….

close