उद्यापासून विधीमंडळाचं लेखानुदान अधिवेशन,विरोधकांचा चहापाण्यावर बहिष्कार

February 23, 2014 2:58 PM0 commentsViews: 204

Image img_168062_vidhi64_240x180.jpg23 फेब्रुवारी : राज्य विधीमंडळाचं उद्यापासून लेखानुदान अधिवेशन सुरु होतंय. त्यामध्ये 31 मार्चपर्यंतच्या वाढीव खर्चाबरोबरच 30 जूनपर्यंतच्या आगाऊ खर्चाला मान्यता घेतली जाणार आहे. केंद्रीय बजेट सादर होत नसल्यामुळे राज्य विधिमंडळाचं हे अधिवेशन बोलावण्यात आलंय.

या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या संध्याकाळच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसंच राज्याच्या आर्थिक नियोजनाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही करण्यात आली. लेखानुदानाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या चार मागण्या असल्याची माहिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली.

विरोधक आक्रमक

  • आदर्श घोटाळ्यासंदर्भात राज्यपालांकडून अशोक चव्हाणांना वाचवण्याचा प्रयत्न का?
  • राज्यपाल आणि सरकारच्या भूमिकेत तफावत का?
  • गंभीर गुन्हे असलेल्या 16 मंत्र्यांवर काहीच कारवाई का नाही?
  • टोल फ्री महाराष्ट्राची घोषणा करा, एलबीटी मुक्त महाराष्ट्र हवा

तर दुसरीकडे, सरकारनं निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना खूष करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू आणि धान्यांवरची करसवलत कायम ठेवण्यासाठी अध्यादेश काढला आहे. विशेष म्हणजे या करसवलतीवर लेखानुदान अधिवेशनात चर्चा टाळण्यासाठीच हा अध्यादेश काढण्यात आलाय. त्यानुसार सोलापुरी चादरी, टॉवेल्स, सुका मेवा, चहा पावडरचे पुडे यांच्यावरची वॅटची सवलत कायम ठेवण्यात येणार आहे. तांदूळ गहू डाळींचं पीठ , हळद , मिरची , चिंच , गूळ , खोबरं , अशा काही चीजवस्तूंवरची करसवलत कायम ठेवण्यात येणार आहे. या करसवलतीची मुदत येत्या 31 मार्चला संपतेय त्यामुळेच अध्यादेश काढण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

करसवलतीचा अध्यादेश

  • सोलापुरी चादरी, टॉवेल्स, सुका मेवा, चहा पावडरचे पुडे यांवर वॅटची सवलत कायम
  • तांदूळ, गहू, डाळींचं पीठ, हळद, मिरची, चिंच, गूळ, खोबरं यांच्यावरची करसवलत कायम

दरम्यान चालू वर्षाचा म्हणजे 2014 -2015चा अर्थसंकल्प येत्या जुलैमहिन्यात होणारर्‍या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

close