विदर्भ, मराठवाडय़ात गारपीटीसह अवकाळी पाऊस,अनेक जिल्ह्यात पाण्याची टंचाई

February 24, 2014 9:55 AM0 commentsViews: 449

fruits24 फेब्रुवारी :   विदर्भाला काल अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा फटका बसलाय. नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतल्या उभ्या पिकाचं नुकसान झालंय. शहरातही या वादळीवार्‍यांमुळे अनेक झाडं पडली आणि काही घरांची छप्परही उडून गेलीयेत. या पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झालेत.

हिंगोली जिल्ह्यात पाऊस आणि गारपीटीमुळे गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, मका, ज्वारी या पिकांचं नुकसान झालंय. आधीच अतिवृष्टीमुळे विदर्भातला शेतकरी अडचणीत सापडला होता आणि आता अवेळी पावसानं तर शेतकरी हवालदिल झालाय.

तर दुसरीकडे मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्याला मात्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतायेत. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्यावर्षी फारसा पाऊस न झाल्यानं जिल्ह्यातली धरणं भरली नव्हती. त्याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातली धरणं कोरडी पडायला सुरुवात झालीये. मांजरा धरणातून बीड, लातूर, आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र हे धरण फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरडं पडलंय. भूम, कळंब, परंडा या 3 तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय.

close