अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी

February 26, 2014 2:04 PM0 commentsViews: 315

26 फेब्रुवारी : अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय. उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय. नाशिकमधल्या निर्यातीच्या द्राक्षांना याचा मोठा तडाखा बसला. नंदुरबारमध्ये हातात आलेलं मिर्चीचं पीक भिजलंय. तर धुळ्यात तूर, गहू यांचं अतोनात नुकसान झालंय. काढणीला आलेली पीक या पावसात सापडल्यानं शेतकरी त्रासलाय.

जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हजारो हेक्टरवरची पीकं जमीनदोस्त झालीत. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि आता झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. काढणीसाठी आलेला गहू, हरभरा, मका ही पीकं तसंच डाळींबाच्या बागाही जमीनदोस्त झाल्यात. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीची गांभिर्यानं दखल घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शेतकर्‍यांना खरंच मदत मिळेल का, हाच प्रश्न आहे. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं झोडपलंय. मंगळवारी रात्री रात्री 2 तास पाऊस झाला. पूर्णा, जिंतूर, सोनपेठ आणि पाथरी तालुक्यात जोरदार वारे आणि पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हाताशी आलेल्या हरभरा, ज्वारी, गहू या पिकांबरोबरच आंबा, कापूस यांचंही मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकर्‍यांनी सरकारकडं मदतीची मागणी केली आहे.

close