दाभोलकरांचे मारेकरी पकडण्यात अपयशी, पुणे पोलिसांनीही टेकले हात

February 26, 2014 10:37 PM0 commentsViews: 1233

gulabrao pole26 फेब्रुवारी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात अपयश आलंय अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अगोदरच देऊन हात वर केले पण आता पुणे पोलिसांनीही आम्हाला अपयश आलं असं म्हणत हात टेकले आहे.

दाभोलकरांच्या खुनाला सहा महिन्यांहून जास्त काळ लोटलाय. पण, त्यांच्या मारेकर्‍यांपर्यंत पोहोचण्यात अपयश आल्याची कबुली, आता खुद्द पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिलीय. पुण्यामध्ये आज (बुधवारी) वार्षिक गुन्हे अहवालाची माहिती देण्यासाठी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

खुनाबाबत माहिती देणारं कोणीही समोर आलेलं नाही. त्यामुळे पोलीस खुन्यांपर्यंत पोहचू शकलेले नाही, असं पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचं म्हणणं आहे. तसंच दाभोलकरांच्या हत्येचा तपास सुरू आहे. मात्र हे प्रकरण किचकट असल्याने आणि ठोस माहिती समोर येत नसल्याने आरोपींपर्यंत पोहचू शकत नसल्याचं पोळ म्हणाले.

या खुनाच्या तपासादरम्यान दाभोलकरांच्या खुनाच्या प्रकरणात मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केलीय. त्यांच्याकडून माहिती मिळत असल्याचंही पोलिसांकडून सांगितलं जात होतं. मात्र त्यांच्याकडून काहीही माहिती मिळत नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे नागोरी आणि खंडेलवाल यांना फक्त वेळ मारुन नेण्यासाठीच अटक करण्यात आली का काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

close