राजकारण्यांचे दुर्लक्ष

February 27, 2014 2:40 PM0 commentsViews: 48

विवेक कुलकर्णी, मुंबई.
27 फेब्रुवारी : दरवर्षी मराठी भाषा दिन आल्यावर राजकीय पक्ष मराठीचे गोडवे गात असतात. पण याच मराठीच्या संवर्धनासाठी स्थापन केलेल्या मराठी भाषा विभागाकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही दोघांनीही दुर्लक्षच केलं आहे.

केवळ नावाला स्थापन केलेला मराठी भाषा विभाग….!
मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ, अशा घोषणा…!
मराठी भाषेच्या नावावर राजकीय श्रेय लाटण्याचे असे प्रयत्न सत्ताधार्‍यांनी केले खरे…पण, मराठी भाषेच्या विकासासाठी लढणार्‍यांची झोळी आज रिकामीच आहे. कारण, गेली साडेतीन वर्षं अनेक प्रस्ताव मागवूनही महाराष्ट्रात मराठी भाषा विभागाकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केलंय.

खुद्द मुख्यमंत्रीच मराठी भाषा विभागाचे प्रमुख आहेत. त्यांना मायबोलीच्या विकासाचा कळवळा दिसत नाही ! तसचं, मराठीच्या नावावर राजकारण करुन पोसलेल्या विरोधी पक्षांनाही या प्रश्नाचं गांभीर्य नसल्याचा अनुभव मराठी अभ्यास केंद्राला गेली साडेतीन वर्ष येतोय.

येणार्‍या निवडणुकीकडे डोळा ठेवून, हंगामी अर्थसंकल्पात मात्र मराठी भाषेसाठी काही कोटींची तरतूद झालेय आणि केंद्राच्या कोर्टात चेंडू ढकललाय.

मराठी असे आमुची मायबोली, तरी ती अभिजात भाषा नसे, असंच म्हणायची वेळ आज मराठी भाषिकांवर आलीय. मराठीची ही उपेक्षा आणि दशावतार केवळ कोट्यवधींच्या तरतुदींनी थांबणार नाहीत.

close