पराक्रमी प्रतापराव आणि वीर मराठे !

February 27, 2014 4:06 PM0 commentsViews: 1480

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

27 फेब्रुवारी : “म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात…”हे कुसुमाग्रजांचे काव्य ऐकलं की, अंगावर रोमांच उभे राहतात. कारण सरसेनापती प्रतापराव गुर्जरांचा पराक्रम या काव्यातून उलगडण्यात आलाय. आजच्याच दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीदिवशीच कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरीच्या खिंडीत प्रतापरावांनी बलिदान दिले. त्यांच्याच दैदिप्यमान पराक्रमाचा हा एक आढावा.

प्रतापराव गुर्जर… हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतला एक महत्वाचा पैलू. कुडतोजी गुर्जर असं त्यांचं मुळ नावं. मात्र स्वराज्य
स्थापनेचा वसा घेतलेल्या या मावळ्यानं अख्ख मराठ्यांचं साम्राज्य पराक्रमानं गाजवलं. शिवछत्रपतींच्या सैन्यदलात ज्याप्रमाणे तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे मावळे होते, त्यांच्यासरखेच एक म्हणजे प्रतापराव गुर्जर. याच प्रतापरावांनी आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत मोघलांना सळो की पळो करुन सोडलं होतं.

घटना 1674 सालाची…आदिलशहाच्या साम्राज्यातला बहलोल खान महाराष्ट्राच्या विरोधात उभा ठाकला होता. त्यामुळेच महाराजांनी प्रतापरावांना फर्मान सोडलं आणि बहलोलचा बंदोबस्त करण्याचा आदेश दिला. त्यावेळी बहलोल हा कर्नाटकात होता. तिथं प्रतापरावांनी बहलोलला पराभूत केलं खरं. पण त्यावेळी बहलोल प्रतापरावांना शरण आला आणि प्रतापरावांनी त्याला सोडून दिलं.

त्याचवेळी बहलोल खान हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरीच्या खिंडीत तळ ठोकून असल्याची खबर प्रतापरावांना मिळाली. त्यावेळी प्रतापराव गड हिंग्लज जवळच्या सामानगड किल्ल्यांवर होते आणि ज्यावेळी बहलोलची खबर प्रतापरावांना लागली आणि क्षणाचाही विलंब न करता प्रतापरावांसोबत 6 वीर नेसरीच्या दिशेनं दौडले आणि याच नेसरीच्या खिंडीत 7 वीरांनी 15 हजार इतक्या संख्येच्या मोघलांशी सामना केला. अखेर प्रतापरावांसह 7 जणांना बलिदान द्यावं लागलं..ते आजच्याच दिवशी..म्हणजेच महाशिवरात्रीदिवशी..

प्रतापरावांच्या बलिदानानं नेसरीची खिंड पावन झाली खरी मात्र याच खिंडीचा इतिहास लिहीला गेला तो कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तींनी. इतका पराक्रम गाजवूनही प्रतापराव हे इतिहासामध्ये उपेक्षित राहिल्याची खंत इतिहास तज्ज्ञ व्यक्त करतात.

आजही नेसरी खिंडीजवळच्या टेकडीवर घोड्याच्या पाऊल खुणा पहायला मिळतात. त्यामुळे महाशिवरात्रीदिवशीच मराठ्‌यांच्या इतिहासाची साक्ष देणार्‍या या प्रतापरावांच्या बलिदानाला आयबीएन लोकमतचा मानाचा मुजरा…

close