मुलं सांभाळणं जड झालं म्हणून जन्मदात्यांकडून मुलांची हत्या

February 28, 2014 3:30 PM0 commentsViews: 845

hingoli news28 फेब्रुवारी : मुलं सांभाळणं कठीण झाल्यानं आई-वडिलांनीच मुलांचा दगडावर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. पोटच्या तीन वर्षांच्या मुलीची आणि एका वर्षाच्या मुलाचा आई वडिलांनीच निर्दयपणे खून केला.

हत्या केल्यानंतर मुलांचे मृतदेह कळमनुरी तालुक्यातल्या एका शेतामधल्या विहिरीत फेकून दिले आणि खून करून इतर तीन मुलांसह आई वडील अहमदनगरला पळून गेले. विहिरीत फेकलेल्या चिमुरड्यांची ओळख पटणं कठीण होतं. पण बाळापूर पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि आजूबाजूची गावं पिंजून काढली तेव्हा हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी परसराम सटवाजी बेले आणि त्याची पत्नी मीरा बेले यांना अटक केली. पोलिसांना दिलेल्या जबानीत बेले दाम्पत्यानं मुलं सांभाळणं कठीण झाल्यानंच खून केल्याची कबुली दिलीये. हत्या झालेला एक वर्षांचा चिमुरडा अपंग होता असेही समजते. बेले दाम्पत्याला आणखी 3 मुलं आहेत.

close