‘सबका’ विनाश नक्की आहे – मोदी

March 2, 2014 5:42 PM0 commentsViews: 1746

modi up02 मार्च :  देशात भाजपचे वारे वाहात आहे. हे नुसते वारे नसून हे वादळ आहे. निवडणुका घोषित झाल्यानंतर याचे सुनामीत रुपांतर होणार आहे. या सुनामीत ‘सबका’ विनाश नक्की आहे. ‘सबका’ने सगळ्यांना लुटून खाल्ले आहे. ‘स’ म्हणजे समाजवादी पक्ष, ‘ब’ म्हणजे बहुजन समाज पक्ष, ‘का’ म्हणजे काँग्रेस, असं लखनौमधल्या विजय शंखनाद रॅलीला संबोधीत करताना मोदी म्हणाले.

‘देशाला समृद्ध करायचे असेल तर, प्रथम उत्तरप्रदेश संपन्न झाला पाहिजे. देशाच्या समृद्धीचा पाया उत्तरप्रदेश आहे. उत्तरप्रदेश समृद्ध झाल्यानंतर देशाला समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही.  असंही ते म्हणाले.
विजय शंखनाद रॅलीत मोदींनी सर्वाधिक हल्ला समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांच्यावर केला. ‘नेताजी मतांचे राजकारण बंद करा आणि विकासाचे राजकारण करा. अखिलेश यादव यांच्या सरकारने गेल्या एक वर्षात 150 दंगली घडवून आणल्या आहेत. तर, गुजरातमध्ये 10 वर्षांमध्ये दंगल घडलेली नाही. साधा कर्फ्यू सुद्धा लागलेला नाही. उत्तरप्रदेशात आजही विजेचा तुटवडा आहे. गुजरातमध्ये 24 तास वीज उपलब्ध आहे.’ असं मोदी म्हणाले.
अपंगाच्या नावावर एक केंद्रीय मंत्री पैसे खात आहेत. त्याला दुसरे मंत्री समर्थन देतात. आमचे केंद्रीय मंत्री 70 लाखांचा भ्रष्टाचार करणार नाहीत. जर 70 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप असता तर कदाचित मान्य केला असता. एवढे निर्लज्ज नेते उत्तरप्रदेशचे असून ते केंद्रात मंत्री आहेत, असा भ्रष्टाचाराचा आरोप मोदींनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्यावर नाव न घेता केला. आमची धर्मनिरपेक्षता म्हणजे इंडिया फर्स्ट अशी आहे, असा टोला मोदींनी खुर्शीद यांना लगावला.
close