केमिकल रंगामुळे अंबरनाथमधल्या 90 मुलांना विषबाधा

March 12, 2009 6:30 AM0 commentsViews: 5

12 मार्च अंबरनाथकिरण सोनावणेरंगपंचमीला वापरल्या जाणा-या केमिकल रंगामुळे ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमधल्या 90 मुलांना विषबाधा झाली आहे. रंगपंचमी दिवशी रंग खेळत असताना, ते रंग मुलांच्या तोंडात गेले. आणि त्यानंतर त्यांना उलट्या,मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला.अंबरनाथमधल्या भेंडीपाडा इथं राहणारी ही सर्व मुलं आहेत. या मुलांना आधी उल्हासनगरला आणि नंतर ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यापैकी 12 मुलांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी चार दुकानदारांना ताब्यात घेतलं आहे. ह्या दुकानदारांनी उल्हासनगरमधील ज्या विक्रेत्याकडून हे रंग विकत घेतले त्याचा तपास आता पोलीस घेत आहेत.विषबाधा झालेल्या 9 मुलांना मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमध्ये तसचं काही मुलांना अंबरनाथमधल्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही विषबाधा नेमक्या कोणत्या रासायनिक पदार्थापासून झाली आहे याचं नेमकं निदान अजूनपर्यंत होऊ शकलं नाही. त्यामुळे मुलं सुधारली असं वाटत असताना पुन्हा थोड्यावेळांनी मुलांची प्रकृती बिघडते अशी डॉक्टरांनी माहिती दिली. रंगपंचमी खेळल्यानंतर ही मुलं आपापल्या घरी गेली. जेवल्यानंतर ह्या मुलांना उलट्या, मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना उल्हासनगरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

close