राज-गडकरी भेटीचा विषय संपला -उद्धव ठाकरे

March 5, 2014 2:52 PM0 commentsViews: 2945

Image udhav_thakare344_300x255.jpg05 मार्च : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे तीव्र नाराज झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता नरमाईची भूमिका घेतली असून या भेटीबद्दल प्रतिक्रिया दिलीय. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता गडकरी-राज भेटीचा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे अशी भूमिका उद्धव यांनी मांडलीय.

तसंच यासंदर्भात उद्धव ठाकरे नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. या भेटीबद्दल गडकरींचं काय मत आहे आणि आमची काय भूमिका आहे हे सांगण्यासाठी भेट घेणार असल्याचं उद्धव यांनी सांगितलं.

नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे शिवसेनेनं तीव्र संताप व्यक्त केलाय. शिवसेनेच्या नेत्यांनी मनसेची आम्हाला गरज नाही असं सांगत भाजपवर नाराजी व्यक्त केलीय. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याची धमकीच दिलीय. सेनेचं मुखपत्र ‘सामना’मधूनही या भेटीवर आसुड ओढण्यात आला. गडकरींचा सत्यनारायण अशा आशयाची टीका आजच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

नितीन गडकरी हे एक पक्के व्यापारी गृहस्थ आहेत. सहकार, ऊर्जा,साखर, इथेनॉल, पाणी शुद्धीकरण अशा क्षेत्रात तर गडकरी यांनी कर्तबगारीची पूर्ती करून एक उत्तम व्यापारी म्हणून र्किती मिळवली आहेच. पण राजकारणातही कोणतेही भांडवल भरीस न घालता हवे ते मिळवण्याची कला त्यांनी प्राप्त करून घेतली आहे. नितीन गडकरी यांचे कसब असे की, त्यांनी मनसेप्रमुखांच्या हातावर दक्षिणा न ठेवता पाठींबा मिळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि कोणताही टोल न देता न घेता मनसेप्रमुखांनी त्यास होकार दिल्याची बातमी फुटली आहे. जगाच्या राजकारणात इतका स्वस्त आणि मस्त सौदा आत्तापर्यंत झाला नसेल आणि त्याबद्दल गडकरी यांच्या व्यापारी कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. जणू तागडीही त्यांची ,मालही त्यांचा व गल्लाही त्यांचा. अशा शब्दात टीका केलीय.

पण आता उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पुढाकार घेतलाय. राज-गडकरी भेटीचा विषय आमच्यासाठी संपलाय. याबाबत लवकरच आपण गडकरी यांची भेट घेणार आहोत असं उद्धव यांनी स्पष्ट केलाय. तसंच आमची युती सक्षम आहे या भेटीचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण उद्धव यांनी दिलंय.

close