राहुल गांधींनी साधला कोळी बांधवांसोबत संवाद

March 6, 2014 3:11 PM0 commentsViews: 628

rahul @ koliwada06 मार्च : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असून, त्यांनी आज (गुरुवार) वर्सोवा येथील कोळी बांधवांशी चर्चा केली.

राहुल गांधी यांनी वर्सोवा येथील कोळीवाड्यात जाऊन कोळी बांधवांशी चर्चा केली. यावेळी कोळी बांधवांनी मच्छीमारीसाठी येणार्‍या अडचणी, राहत्या जागेचा प्रश्न उपस्थित केला. शिवाय, महिलांनीही विविध समस्या मांडल्या.

कोळी बांधवांनी समाजामधील आमदार, खासदार निवडून दिल्यास समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते. चव्हाण यांनीही कोळी बांधवांच्या प्रश्नांना उत्तर दिली.

दरम्यान, कोळी बांधवांनी राहुल गांधी व पृथ्वीराज चव्हाण यांना लाल टोपी देऊन स्वागत केले. यावेळी गांधी यांनी लाल टोपी घालण्यामागील उद्देशही जाणून घेतला.

त्याआधी राहुल गांधी यांनी गिरगावमध्ये ठक्कर हॉलमध्ये संपादकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संपादकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली नाही. पण, मोदी आणि भाजपच्या विचारसरणीवर त्यांनी जोरदार टीका केली.

मात्र, यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांबाबतचा प्रश्न टाळला.अशोक चव्हाण काल औरंगाबादमधल्या सभेत राहुल गांधींच्या स्टेजवर उपस्थित होते. राहुल गांधींनी भ्रष्टाचारावरून भाजपला लक्ष्य केलं. पण आदर्श प्रकरणाचा त्यांना विसर पडला का, असा प्रश्न विचारला गेला. पण त्यावर मात्र राहुल गांधींनी उत्तर देण टाळलं.

close