महायुतीत नवा भिडू घेणार नाही -मुंडे

March 6, 2014 6:22 PM0 commentsViews: 1232

munde on mns06 मार्च : पाच पांडवांची महायुती पूर्ण झालीय त्यामुळे आता नवा भिडू महायुतीत घेणार नाही. कारण जागावाटपe झाल्या असून अशा परिस्थिती मनसेला महायुतीसोबत घेणं शक्य नाही, असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलंय. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत गोपीनाथ मुंडे यांनी नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. यावेळी त्यांनी मनसेला महायुतीत आणण्यासाठी प्रयत्न करणार अशी भूमिका मांडली. पण या भेटीमुळे महायुतीच्या गोटात अस्वस्थता पसरली. सेनेनं तर कडाडून विरोध केलाच पण भाजपचे नेतेही बुचकळ्यात पडले. पण महायुतीत मनसेला घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी मांडली.

मनसेनं महायुतीत यावं यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न केले. पण मनसेनं महायुतीत यायचं की नाही हा ठाकरे बंधूंचा प्रश्न आहे. या दोघांचीही कुणीही समजूत काढू शकत नाही. एकत्र येण्याचा निर्णय फक्त ठाकरे बंधूंच घेऊ शकतात. आता गडकरी यांनी जरी यासाठी प्रयत्न केले तरी त्यात काही तथ्य नाही. कारण जागावाटपाचा विषय पूर्ण झालाय. ही बाब नितीन गडकरी, राज ठाकरे यांना माहित आहे त्यामुळे मनसे महायुतीत येईल अशी शक्यता नाही असंही मुंडेंनी सांगितलं.

तसंच मी, राज ठाकरेंना पुण्यात भेटलो होतो, पण गेल्या आठवड्यात नाही असंही मुंडे स्पष्ट केलं. राज-गडकरी भेटीला मुंडे-गडकरी वादाची किनार असल्याची चर्चा सुरू होती. पण मुंडेंनी हा मुद्दा खोडून काढलाय. गडकरी आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाही. महायुतीचा विषय हा राज्यातला आहे. त्यासाठी मी आणि देवेंद्र फडणवीस लक्ष्य घालून आहोत. त्यामुळे गडकरींनी महायुतीच्या कोणत्याही बैठकीत सहभाग घेतला नाही. त्यांना जरी असं वाटलं की, मनसे आणि महायुतीने एकत्र यावं पण हे शक्य नसून याबाबत त्यांनी आमच्याशी चर्चाही केली नाही असंही मुंडे म्हणाले.

close