भय इथले संपत नाही..!

March 7, 2014 6:56 PM0 commentsViews: 739

farmar susaid07 मार्च : बळीराजावर अस्मानी संकट ओढावले असून ‘भय इथले संपत नाही..’ अशी परिस्थिती उद्भवली आहे. अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीमुळे 2 शेतकर्‍यांनी आत्महत्या केलीय. तर गारपिटीच्या तडाख्यामुळे 8 जणांचा बळी गेला आहे. एवढेच नाही तर या तडाख्यात मुक्या जीवांचा करुण अंत झालाय. 65 मोठी जनावरं, 83 लहान जनावरांचा गारांमुळे मृत्यू ओढावला. तर 800 पक्षीही यात मारले गेले आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याच्या शेतीचं नुकसान झाल्याने औरंगाबादमल्या वैजापूर तालुक्यातल्या बोरसरचे शेतकरी दत्तू शेळके यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दत्तू शेवाळे यांच्या मुलीचं लग्न 8 मार्च रोजी होतं. पण कांद्याचं नुकसान झाल्यानं लग्नाला पैसा कुठून आणणार या तणावाखाली त्यांनी जीवन संपवलं. उस्मानाबादमध्येही गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीने ज्वारीच्या पिकाचं पूर्ण नुकसान झालंय. आता बँकेचं कर्ज फेडायच्या धास्तीने भूम तालुक्यातील सुकटा येथील शेतकरी मच्छींद्र भारती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आपल्या नातीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज आता फेडायचं तरी कसं या चिंतेन त्यांनी ही आत्महत्या केलीय.

याशिवाय सिन्नरमध्ये एका शेतकर्‍याचं गारपिटीच्या तडाख्यानं तर निफाडमध्ये एका शेतकर्‍याचं झालेल्या नुकसानीचा धक्का बसून मृत्यू झालाय. बीड जिल्ह्यात तिघांचा तर जालना आणि हिंगोली एकाचा गारपिटीमुळे मृत्यू झाला. 65 मोठी जनावरं आणि 83 लहान जनावरांचाही गारांमुळे मृत्यू ओढावला. तर 800 पक्षीही यात मारले गेले आहे. या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी आता या शेतकर्‍याला सरकार काय मदत करतंय, या कडे आता बळीराजा आस लावून आहे.

गारपिटीचे बळी

  • सिन्नर – 1
  • निफाड – 1
  • बीड – 3
  • जालना – 1
  • हिंगोली – 1

गारपिटीमुळे जनावरांचा बळी

  • मोठी जनावरं 65
  • लहान जनावरं 83
  • पक्षी 800

close