मोदींच्या बालेकिल्ल्यात केजरी’वार’ !

March 7, 2014 10:36 PM0 commentsViews: 1716

kejriwar 34607 मार्च : सध्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्याच विरोधात मोहीम उघडलीय. शिवाय गेली काही वर्ष विरोधी पक्षात बसून आपलं अस्तित्व गमावलेल्या काँग्रेसची जागा केजरीवाल घेत आहेत, असं तिथल्या विश्लेषकांचं म्हणणं आहे.

सध्या अरविंद केजरीवाल त्यांना जे योग्य वाटतंय ते करत आहेत. केजरीवाल असा काही राजकीय आखाडा उभा करत आहेत, जेणेकरुन त्यांच्याकडं सगळ्यांचं लक्ष आकर्षित होईल. यावेळेस फक्त स्थळ बदललं आहे, सध्या त्यांचा मुक्काम आहे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये. नरेंद्र मोदींची त्यांच्या घरी भेट घेण्यासाठी गेलेल्या आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं आणि त्याहीवेळी आपल्या अनोख्या कृतीनं ह्या कार्यकर्त्यांनी माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

याठिकाणी केजरीवाल यांचं ध्येय हे राजकारणाच्या पलीकडं जाणारं आहे. मोदींच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित करुन केजरीवाल इथं गुजरातमध्ये रिक्त असलेली विरोधी पक्षाची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या दशकभरात जे काम काँग्रेसला जमलं नाही, ते आता केजरीवाल करत आहेत, असं लोक म्हणत आहेत. विशेष म्हणजे अशा गोष्टी करुन केजरीवाल यांनी गुजरातमधल्या वृत्तमधली पहिल्या पानावरची जागा पक्की केलीय, पण मुख्य विरोधी पक्ष मात्र अजूनही यावर गप्पच आहे.

केजरीवाल यांच्या कृत्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं असंच मोदींनी ठरवलेलं दिसतंय. पण गुजरात प्रदेश भाजप मात्र त्यांच्या आरोपाला उत्तर देताना दिसतेय.

गुजरातमध्ये केजरीवाल यांच्या पक्षाला तसा काही फार मोठा जनाधार नाही. पण तरीही याठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोहीम उघडण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आहे. पण याचा फायदा त्यांना किती होणार, हे पाहणं मात्र उत्सुकतेचं असेल.

close