भडक आणि बटबटीत ‘गुलाब गँग’ !

March 7, 2014 11:12 PM0 commentsViews: 2069

अमोल परचुरे,समीक्षक

गुलाब गँग… संपत पाल यांनी उत्तर प्रदेशात ग्रामीण अशिक्षित स्त्रियांना अत्याचारातून मुक्त करुन संघटित करण्यासाठी गुलाबी गँगची स्थापना केली होती. गुलाबी गँगची दहशत उत्तर प्रदेशातल्या गावागावात आहे. याच विषयाशी साधर्म्य असलेला गुलाब गँग हा सिनेमा… यावरून न्यायालयात बरीच वादावादी सुरू आहे. सध्यातरी सिनेमा रिलीज करायला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे, त्यामुळे माधुरी दीक्षित फॅन्सना काहिसा दिलासा मिळाला असेल. पण अगदी खरं सांगायचं तर माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्यासारख्या ए-ग्रेड स्टार्सना घेऊन एक भडक आणि बटबटीत सिनेमा बनवण्यात आलेला आहे. अनुभव सिन्हा आणि सौमिक सेन यांनी संपत पाल यांच्या गुलाबी गँगवर आधारित सिनेमा बनवताना त्याला वास्वापासून दूर नेऊन ठेवलंय आणि बॉलिवूडचा सगळा मसाला ठासून भरलेला आहे.

काय आहे स्टोरी ?
gulab gang 45
गुलाब गँगमध्ये संघर्ष आहे रज्जो म्हणजे माधुरी दीक्षित आणि सुमित्रादेवी म्हणजे जुही चावला यांच्या दरम्यानचा…महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहाता यावं या उद्देशानं रज्जो एक आश्रम चालवत असते. या आश्रमाची आणि पर्यायाने रज्जोची लोकप्रियता वाढत चाललीये, आणि या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा डाव आहे सुमित्रादेवीचा…म्हणजे नाव गुलाबी गँगचं आणि प्रत्यक्षात एक टिपिकल राजकीय सिनेमा अशी याची अवस्था झालीये. उत्तरप्रदेशातल्या माधोपुरमध्ये घडणार्‍या या कथेत ऍक्शन, आयटम साँग, डायलॉगबाजी असा सगळा अतिरंतिज मामला आहे.

परफॉर्मन्स
2346madhuri juhi
गुलाब गँगची एकमेव जमेची बाजू म्हणजे माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांची काही सीन्समध्ये रंगलेली जुगलबंदी…माधुरीने तर या सिनेमात अगदी दबंगस्टाईल फाईटसुद्धा केलीये, पण जुही चावलाने यात खरी बाजी मारलेली आहे. जुहीला आपल्या करियरमध्ये पहिल्यांदाच असा तगडा रोल मिळाल्यामुळे तिने एकदम जान ओतलेली आहे. याशिवाय तनिष्ठा चटर्जी, प्रियांका बोस आणि दिव्या जगदाळे यांनीही दमदार परफॉर्मन्स दिलेला आहे.

गुलाब गँगला रेटिंग – 50

close