पिकं गेली, जनावरं मेली, घरं पडली..,आता पुढं काय?

March 10, 2014 11:49 PM0 commentsViews: 1170

10 मार्च : मराठवाडा, विदर्भ,खान्देश, पश्चिम महाराष्ट्र…सगळीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं अक्षरश: हाहाकार माजवलाय. हातची पिकं गेली आहे. पंचनामे व्हायला अवकाश आहे आणि मदत मिळायला त्याहून उशीर पाहता पाहता होत्याचं नव्हतं झालंय. आता पुढं काय हीच चिंता आता बळीराजाला आहे.

काळ्याभोर जमिनीत डौलाने उभी राहिलेली पिकं पाहता पाहता आडवी झाली आणि बळीराजाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. एरवी आतुरतेनं वाट पाहणार्‍या राज्यातल्या शेतकर्‍याचा पावसाने अवेळी हजेरी लावून मात्र काळजाचा ठोका चुकवलाय. घाम गाळून कसलेली पिकं हातची गेलीये. आतापर्यंत कधीही पाहिल्या नाहीत अशा गारांचा वर्षाव झाला. उभ्या पिकात गारांचा खच पडला आणि हातात भरलेल्या कणसाचे दाणे येण्याऐवजी आलीये त्याची झालेली माती.

अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं फक्त शेतीचचं नाही तर घरादारांचीही पडझड केलीये. कुणाच्या घराचं छप्पर उडून गेलंय तर कुणाचं घरंच जमीनदोस्त झालंय. सोलापूरमध्ये तर घरच अंगावर कोसळून यमुना गोरेंच्या मृत्यू झालाय. तर औंढीमध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या जीव वाचवण्यासाठी वर्‍ह्यांड्यावर पत्रे मारत असलेल्या एका शाळेच्या शिपायाला जीव गमवावा लागलाय. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सात जणांचे बळी गेलेत.

फक्त शेती, घरंच नाही तर मुकी जनावरंही वादळवारा आणि गारपिटीच्या तडाख्यातून वाचलेली नाही. जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोलमध्ये उतरण गावात गारपीट आणि थंडीमुळे जनावरांचा मृत्यू झालाय. तर वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये चरायला गेलेल्या 300 पेक्षाही जास्त शेेळ्यामेंढ्या गारपीटीमध्ये बळी पडल्यात. निसर्गाच्या या तडाख्याने काही ठिकाणी दुभत्या जनावरांनी दूध देणंही बंद केलं होतं. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेलं हे पशुधनही हातचं जाऊ नये यासाठी शेतकर्‍यांना अटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत.

एरवी समृद्ध असलेला पुणे जिल्ह्यातल्या बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. दौंडमध्ये शेतात काम करणारे 47 मजूर गारपिटीने जखमी झाले आहे. राज्यभरातील गहू, ज्वारी, हरभरा, मका, भुईमूग ही पिकं तर गेलीच आहेत. पण संत्री, डाळींब बागा उध्वस्त झाल्यात आणि द्राक्षांचे घोसच्या घोस जमिनीवर पडले.पिढ्यानं पिढ्या जपलेले पानाचे मळेही भुईसपाट झालेत.

एरवी टीव्हीवर किंवा फोटोतच हिमवर्षाव पाहणार्‍या या सर्वसामान्य शेतकर्‍याला भल्यामोठ्या गारांचा असह्य मारा सहन करावा लागला. आता पंचनामे होणार , मग मदत मिळणार…तीही कधी आणि किती काहीच माहिती नाही. या रब्बीच्या हंगामावर अनेकांची स्वप्नं अवलंबून होती. कुणाला घरावर कौलं चढवायची होती, कुणाला मुला-मुलीचं लग्न करायचं होतं तर कुणाला पुढच्या हंगामासाठी बियाणं, खतांची बेगमी करायची होती. पण आभाळ फुटलं. कसलेली काळीभोर जमीन पांढरीशुभ्र झाली आणिअनेक आयुष्य मात्र काळवंडली.

close