मोदींना पाठिंबा देण्याची जणू ‘डर्बी रेस’च सुरू आहे – उद्धव ठाकरे

March 11, 2014 9:37 AM0 commentsViews: 2365

Image img_229422_udhavonraj_240x180.jpg11 मार्च :  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची जणू ‘डर्बी रेस’च सुरू आहे, अशा शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला हाणला. कालपर्यंत मोदी यांना लाखोल्या वाहणारे आरंभशूर पुढारीही आज ‘मोदी- मोदी’ करत त्यांना न मागता पाठिंबा देत आहेत. वातावरण बदलत असल्याचा यापेक्षा मोठा पुरावा तो कोणता? असंही लेखात म्हटले आहे.

रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढवणारच असे स्पष्ट करतानाच जे खासदार निवडून येतील ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील अशी घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवरच शिवसेनेचे मुखपत्र असणा-या ‘सामना’च्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

तसेच भाजप नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे शिवसेना व भाजपमध्ये नाराजी असल्याच्या चर्चेबाबतही या लेखात टीका करण्यात आली आहे. शिवसेना-भाजपचे नाते टिकेल की नाही, या प्रश्‍नाचे ओझे वाहून स्वत:ला त्रास करून घेण्याची गरज इतरांना नाही, असे सांगत भाजपसोबत सेनेचे नाते हे देशाच्या राजकारणातील सगळ्यात जुने नाते असल्याचे लेखात म्हटले आहे.

… जणू एकप्रकारे पाठिंब्याची ‘डर्बी रेस’च चाललीे आहे

मोदी यांना आज देशभरातून पाठिंबा मिळतो आहे. जणू एकप्रकारे पाठिंब्याची ‘डर्बी रेस’च चाललीे आहे आणि जो-तो आपापला घोडा दामटवीत स्वत:च्याच घोड्यावर जुगार खेळताना दिसत आहेत. कालपर्यंत मोदी यांना लाखोल्या वाहणारे आरंभशूर पुढारीही आज ‘मोदी- मोदी’ करत त्यांना न मागता पाठिंबा देत आहेत. वातावरण बदलत असल्याचा यापेक्षा मोठा पुरावा तो कोणता?

महाराष्ट्राच्या दुश्मनांना ‘दे माय धरणी ठाय’ करुन

– शिवसेना हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचे वैभव आहे. त्या वैभवामुळेच महाराष्ट्राचा मानमरातब वाढला.कोणी कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना ही वाघासारखी डरकाळी फोडतच राहणार आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांना ‘दे माय धरणी ठाय’ करुन सोडणार याविषयी आम्ही निश्चिंत आहोत.

भाजपसोबतचे नाते देशाच्या राजकारणातील सर्वात जुने नाते ‘सामना’चा दावा
सध्या सगळ्यांना एकाच प्रश्नानं ग्रासलंय, ते म्हणजे उद्याच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे काय आणि कसे होणार? शिवसेना आणि भाजपचे नाते टिकेल की नाही या प्रश्नाचे ओझे वाहून स्वत:ला त्रास करुन घेण्याची गरज इतरांना नाही.त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. भारतीय जनता पक्षाबरोबरील आमचे नाते हे देशाच्या राजकारणातील सगळ्यात जुने नाते आहे. प्रखर हिंदुत्वाच्या मजबुतीसाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आले. अनेक वाद- वादळांनंतरही ही युती टिकून राहिली. ही युती तुटावी आणि हिंदू मतांचे विभाजन व्हावे यासाठी अनेकांची कपट-कारस्थाने वायाच गेली. अनेकदा घरभेदीपणाही झाला. त्या सगळ्यांना ही युती पुरुन उरलीच ना? त्यामुळे आज कोण काय बोलतंय आणि कोणते मायावी जाल पसरुन युतीला संभ्रमात टाकतंय याचा विचार आम्ही का करावा?

close