शिवबंधनाचा धागा तुटला, खा. बाबर यांचा सेनेला जय महाराष्ट्र

March 11, 2014 6:25 PM0 commentsViews: 3902

gajana babar11 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिक शिवबंधनाचा धागा तोडून सेनेतून बाहेर पडत आहे. मावळ मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन बाबर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्याने गजानन बाबर यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे नाराज होऊन बाबर यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आयबीएन लोकमतशी बोलताना बाबर यांनी सेनेवर टीका केली आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

गेली 45 वर्ष आपण सेनेसाठी निष्ठेनं काम केलं. याकाळात तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि मावळचा खासदार ही होता आलं. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं. पण पाचवर्षापूर्वी काँग्रेसच्या काही मंडळींनी राजकीय स्वार्थापोटी पैसे देऊन तिकीट विकत घेतली. हे आपल्या तत्वात बसत नाही म्हणून शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असा खुलासा बाबर यांनी केला.

याबाबत पक्षश्रेष्ठींना सांगितले पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. माझ्याकडे पैसे नाही म्हणून मला तिकीट नाकारले हे मला पटले नाही. त्यामुळे नाराज होऊन सेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं बाबर यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या अगोदर सेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तर परभणीचे खासदार गणेश दुधगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी कल्याणचे खासदार आनंद परांजपे राष्ट्रवादीच्या गळाला लागले.

close