राज्यात 28 जिल्ह्यांना गारांचा तडाखा, 28 बळी

March 12, 2014 11:02 PM0 commentsViews: 1400
Untimely rain, hailstorm damaged in Maharashtra

Untimely rain, hailstorm damaged in Maharashtra

12 मार्च : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलंय. राज्यात किती ठिकाणी गारपिटीचा फटका बसला याची आकडेवारी समोर आलीय. राज्यात एकूण 28 जिल्ह्यांना गारपिटीचा तडाखा बसलाय. औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नाशिक हे सर्वाधिक बाधित जिल्हे आहेत. एकूण 28 जणांचा मृत्यू झालाय. तर तब्बल 13 लाख 70 हजार 326 हेक्टर शेतीचं तीव्र नुकसान झालंय.

उद्या मदतीची घोषणा

गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकर्‍यांना मदत देण्याबद्दल महत्त्वाची घोषणा केलीय. याबद्दल उद्या बुधवारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवण्यात येईल आणि त्यात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीवर चर्चा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी  सांगितलंय. सध्या निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे राज्याचे मुख्य सचिव ही मदत जाहीर करणार आहेत. या मदतीसाठी गरज पडल्यास काही विकासकामं बाजूला ठेवली जातील आणि आवश्यकता असल्यास कर्जही काढण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली

मुख्यमंत्री बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्याच्या दौर्‍यावर आहेत. ह्या गावातील गारपीटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्याकरिता ते आले मात्र यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी रास्ता रोकोआंदोलन केलं. शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर गवत फेकून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अर्ध्या तास रोखुन धरला. मुख्यमंत्र्यांनी फक्त 10 मिनिट एका शेताची पाहणी करुन काढता पाय घेतला. लोणार तालुक्यातल्या शारा गावात शेतकर्‍यांनी हा रास्ता रोको केला आहे. तातडीनं मदत करण्याची शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात किती नुकसान झालंय ?

  • - 28 जिल्ह्यांमध्ये गारपिटीनं नुकसान
  • - 28 जणांचा मृत्यू, 106 जखमी
  • - 1621 पाळीव प्राण्यांचा मृत्यू
  • - 18,222 घरांचं नुकसान
  • - 13,70,326 हेक्टर शेतीचं तीव्र नुकसान
  • - औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक हे सर्वाधिक बाधित जिल्हे

close