केंद्राच्या 3 पथकांकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी

March 13, 2014 4:39 PM0 commentsViews: 627
hail-on-woodchips

केंद्राच्या 3 पथकांकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी

13 मार्च : राज्यातल्या गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राची पथकं राज्यात दाखल झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र इथं ही पथकं पाहणी करत आहे. नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर इथं एक-एक पथक सध्या गारपीटग्रस्त भागांची पाहणी करतंय. नाशिकमधल्या समितीची विभागीय महसूल आयुक्तांसोबत बैठक सुरू आहे.

ही पथकं प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन आणि शेतकर्‍यांची भेट घेऊन आपला अहवाल केंद्राला सादर करणार आहेत. त्यानंतर केंद्र सरकार आपली मदत जाहीर करणार आहे. सलग झालेल्या गारपीटीमुळे राज्यातल्या हजारो हेक्टरवरचं पीक उध्वस्त झालंय आणि हजारो कोटी रूपयांचं नुकसान झालंय.

शेतकर्‍यांना मदत देताना आचारसंहितेचं कारण आड येणार नाही असं सांगत निवडणूक आयोगाने मदत जाहीर करण्यासाठी परवानगीही दिली आहे. आर एल माथूर, संजीव चोप्रा, प्रदीप इंदुलकर या तीन केंद्रीय पथक सदस्य नाशिक आणि धुळेची पाहणी करणार आहे.

दरम्यान, विदर्भातल्या बळीराजाला गारपिटीपासून काही दिलासा मिळत नाहीय. आज वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमधल्या काही तालुक्यांमध्ये गारपीट झाली. नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यात तर वर्धा जिल्ह्यातल्या सेलू, धोंडगाव खैरे, सेलडोह, खडकी, केळधर या गावांमध्ये गारपीट झाली. या आजच्या गारपिटीमुळे गहू , हरभरा, केळीच्या पिकांचं नुकसान झालंय.

close