देवयानींच्या विरोधात अटक वॉरंट जारी

March 15, 2014 2:01 PM0 commentsViews: 1773

devyani k15 मार्च : भारताच्या वरीष्ठ राजनैतिक अधिकारी देवायनी खोब्रागडे यांना दोनच दिवसांपूर्वी न्युयॉर्क कोर्टाकडून दिलासा मिळाला होता. कोर्टाने हा खटला रद्द केला होता. पण आता खोब्रागडेंच्या विरोधात पुन्हा नव्याने केस दाखल करण्यात आली असून खोब्रागडे यांच्या विरोधात अटक वॉरंटही बजावण्यात आलेलं आहे.

खोब्रागडेंनी आपली मोलकरणी संगीता रिचर्डस हिच्यासाठी व्हिसा मिळवताना बनावट कागदपत्रं देऊन अमेरिकन व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचा, मोलकरणीची पिळवणूक केल्याचा, तिला कमी पगार दिल्याचे आरोप देवयानी खोब्रागडेंवर नव्याने ठेवण्यात आले आहे.

12 डिसेंबर रोजी देवयानींना न्युयॉर्क पोलिसांनी अटक केली होती तसंच अपमानास्पद वागणूक दिली होती. या प्रकरणाचा भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भारताच्या नाराजीमुळे अमेरिकन सरकारने एक पाऊल मागे घेतले होते. देवयानी यांच्या सुटकेसाठी भारताने त्यांना विशेष राजकीय अधिकारीपदी नियुक्त केलं. त्यानंतर न्युयॉर्क पोलिसांनी त्यांची सुटका केली होती.तसंच त्यांना अमेरिकेत येण्यावर बंदीही घालण्यात आलीय.

दोनच दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधातील खटलेही रद्द करण्यात आले होते. हे खटले रद्द केल्यामुळे अमेरिकन सरकारामधील एका गटाने नाराजी व्यक्त केली होती. देवयानी यांच्याविरोधात खटला चालवावा अशी मागणी या गटाने केली. त्यानंतर पुन्हा नव्याने हा खटला दाखल करण्यात आलाय. पण अजूनही खोब्रागडे यांच्या वकीलांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. खोब्रागडे यांचे वकील आता या प्रकरणी कोर्टात आपली बाजू मांडतील.