शिवबंधन तोडून नार्वेकरांनी घेतली पवारांची भेट?

March 16, 2014 4:41 PM0 commentsViews: 1906

rahul navrekar16 मार्च :  विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अचानक माघार घेतलेले शिवसेनेचे नेते राहुल नार्वेकर यांनी आज (रविवार) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षप्रमुख व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. नार्वेकर व पवारांच्या या भेटीमुळे वेगवेगळ्या तर्कांना उधाण आले आहे.

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना नेतृत्वाला अंधारात ठेऊन उमेदवारी अर्ज मागे घेणारे शिवसेनेचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राहुल नार्वेकर पक्षात अस्वस्थ असल्याने गेल्या दोन आठवड्यापासून माझ्याशी संपर्कात होते असे सूचक वक्तव्य शरद पवारांनी केली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल होतील अशी चिन्हे आहेत.
विधानपरिषेदच्या ९ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेतर्फे डॉ. नीलम गो-हे आणि राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि निवडणूक बिनविरोध पार पडली. विशेष म्हणजे नार्वेकर अर्ज मागे घेणार असल्याची माहिती शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंनाही नव्हती असे उघड झाले होते. त्यामुळे नार्वेकर यांनी कोणाच्या सांगण्यावरुन अर्ज मागे घेतला यावर तर्कवितर्क लढवले जात होते. यापार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी रविवारी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत विकासकामाबाबत चर्चा झाल्याचे पवारांनी सांगितले.
मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिली जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. संध्याकाळपर्यंत यावर निर्णय होईल असे समजते.

close