आयपीएलवर अजूनही टांगती तलवार

March 16, 2009 9:44 AM0 commentsViews: 4

16 मार्च आयपीएलच्या तारखांचा गोंधळ अजून थांबलेला नाही. आयोजक आणि गृह मंत्रालया दरम्यान सकाळी दीड तास झालेली चर्चा निष्फळ ठरली. बीसीसीआयचे सेक्रेटरी एन श्रीनिवासन या बैठकीला हजर होते. नवं वेळापत्रक ठरवताना येणा-या अडचणी यावेळी त्यांनी गृह मंत्रालयाला सांगितल्या. आयपीएलच्या संभाव्य तारखा आणि संभाव्य ठिकाणं यांची माहितीही त्यांनी बैठकीत दिली. ज्या राज्यात आयपीएल मॅचेस घ्यायच्या आहेत, तिथलं सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यांच्याशी सल्ला मसलत करूनच नवं वेळापत्रक तयार करण्याची सूचना गृहमंत्रालयाने आयोजकांना दिली आहे. पण सध्यातरी दोघांत एकवाक्यता होताना दिसत नाही. त्यामुळे नवं वेळापत्रक तयार करताना आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच पश्चिम बंगाल राज्य आयोजनासाठी तयार असताना गृहमंत्रालयाने तिथे मॅच भरवायला आक्षेप घेतल्याचं समजतं.पश्चिम बंगाल सरकारने निमलष्करी दलाच्या 30 तुकड्यांची मागणी आयपीएल सुरक्षेसाठी केली आहे आणि या मागणीला गृह मंत्रालय तयार नाही. तसंच आंध्र प्रदेश सरकारने त्यांची टीम डेक्कन चार्जर्सच्या मालकांना एक पत्र लिहून 26 एप्रिलपूर्वी आपण आयपीएलला सुरक्षा पुरवू शकत नसल्याचं कळवलंय. आंध्र प्रदेशमधलं मतदान 23 एप्रिलला संपणार आहे. आयपीएलच्या या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे 26 एप्रिलपूर्वी तीन मॅच हैद्राबादमध्ये होणार होत्या.

close