यशवंतरावांची बखर की शरदरावांची खबर?

March 17, 2014 7:57 PM2 commentsViews: 8830

dipti_raut_ibn_lokmat_nashik- दीप्ती राऊत, ब्युरो चीफ, IBN लोकमत

‘सिंहासन’ आणि ‘सामना’ या चित्रपटांच्या भारावलेपणाची महती एेकत आमची पिढी मोठी झाली. त्या पटेल-साधूंची जोडगोळी आणि ज्यांच्या व्यक्तित्वाबद्दल प्रचंड उत्सुकता त्या यशवंतरावांचे चित्रण म्हणून ‘यशवंतरावांची बखर’बद्दल बर्‍याच अपेक्षा होत्या. एक प्रेक्षक म्हणून आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रस असणारी पत्रकार म्हणून हा सिनेमा पाहताना प्रचंड अपेक्षाभंग झाला.

एक राजकारणी म्हणून आणि एक माणूस म्हणून यशवंतरावांचा जीवनपट हा अनेक अर्थांनी नाट्यपूर्ण आहे. कालच्या-आजच्या आणि उद्याच्या राजकीय-सामाजिक पटलावर एक महत्त्वाचा मानबिंदू म्हणून पाहिले जाते. त्यात साधूंचे लिखाण आणि पटेलांचे दिग्दर्शन यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली होती. स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या दोन अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घुसळणीचा हा नायक. लहानशा गावापासून थेट दिल्लीच्या तख्तापर्यंतचे राजकारण खेळलेला. संरक्षण मंत्री म्हणून एक युद्ध सक्षमपणे हाताळलेला. परराष्ट्र मंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय पटलावर उल्लेखनीय मोहोर उमटवणारा. सोबतच साहित्य, संगीत याची अभिरुची जपणारा आणि पत्नीसोबतचं अत्यंत हळवं नातं जागणारा. पुस्तकांमधून भेटलेले यशवंतराव या चित्रपटाच्या निमित्तानं अधिक कळतील, अधिक उमगतील अशी आशा होती. पण हाती निराशा आली.

yashavan chavan movie

यशवंतरावांची बखर की शरदरावांची खबर?

आज अनेक तरुण दिग्दर्शक डॉक्युमेंटरीजचे समांतर, प्रायोगिक समजले गेलेले विषय अत्यंत प्रभावीपणे मुख्य प्रवाहातील सिनेमात मांडत असताना, या बखरीचा प्रवास नेमका उलट दिशेनं वाटला. पटेल-साधू द्वयींना चित्रपट बनवायचा होता की डॉक्युमेंटरी हा प्रश्न पहिल्याच दहा मिनिटात प्रेक्षकांना पडतो. यशवंतरावांचे बालपण, स्वातंत्र्य संग्रामानिमित्तानं येरवडा जेलमध्ये लाभलेली शाळा, गावातील नेतृत्व हे नाट्यमय पद्धतीनं पुढे येतं. पात्रांची निवड, पात्रांचा अभिनय, लोकेशन, वेशभूषा या सार्‍याबद्दल उत्तमच. पण दिग्दर्शन आणि स्क्रीप्टचा बट्टयाबोळ. कराडची ओळख सांगणारं सुरुवातीचं महाराष्ट्र की लोकधारा टाईप गाणं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अत्रेंच्या टीकेचं पात्र, यशवंतरावांना आठवणारा घाशीराम कोतवाल, घर मागणारे लागू… त्या साऱ्यात अत्यंत विजोड पॅचवर्क वाटतं.

ते सारं डकवण्याचं दिग्दर्शकांचं नेमकं औचित्य काय? त्यात ते डकवण्याची पद्धत तर अत्यंत बाळबोध. उलट यशवंतरावांची राजनीती त्या एेवजी मांडली असती तर चित्रपट वेगळ्या उंचीवर गेला असता. नेहरू की महाराष्ट्र यात निवड करायची झाल्यास मी नेहरूंची करेन, हिमालयाच्या मदतीला धावला सह्याद्री. या यशवंतरावांच्या वाक्यांची फक्त पुनरावृत्ती एेकू आली. त्यामागील त्यांची भूमिका, त्याला जोडून आलेले राजकारण, त्याचे आकलन या सार्‍याला फाटा मिळाला. संवाद तर तद्दन कृत्रिम वाटत होते. मध्येच विवेचन, मध्येच पोवाडा त्या सूत्रसंगतीतही सरमिसळच.

संरक्षण मंत्री म्हणून बोलावण्यासाठी नेहरूंचा फोन आला असता, मला एका व्यक्तीला विचारावेच लागेल, या यशवंतरावांच्या आयुष्यातील अत्यंत हृद्य प्रसंगाशिवाय हा सिनेमा पूर्ण होऊ शकला नसताच. पण दिल्लीत मंत्री असताना, ‘वेणू, तुला रेडिओ घ्यायचा आहे, पण आत्ता माझ्याजवळ तेवढे पैसे नाहीत’ हे पत्नीला कळवणारे यशवंतराव किंवा त्यांच्या पश्चात त्यांच्या बँक खात्यात सापडलेली अत्यंत तुटपुंजी रक्कम हे संदर्भ आजच्या काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले प्रसंग आलेच नाहीत.

खरं तर राजकारणात मुत्सद्देगिरी महत्त्वाची. पण समोरचा करेल ती लबाडी आणि आपण करू ती मुत्सद्देगिरी असं म्हणून कसं चालेल? इंदिरा गांधींना तर यात खलनायकीच चितारलंय. दुसरीकडे शरद पवारांचं मात्र प्रचंड उदात्तीकरण. रेड्डींच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यानचे संदर्भ असोत, महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचा प्रसंग असो वा पुलोदचा प्रयोग असो, वस्तुनिष्ठ, सखोल आणि समतोल मांडणीचा आभाव मध्यंतरानंतर पदोपदी जाणवत राहिला. सरकार पाडण्याबाबत यशवंतरावांचं नेमकं मत काय होतं हे चार भिंतींआत दडलेलं गुपित आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भळबळत राहिलेलं ‘खंजीर’पुराण.

रामटेकवर बैठक सुरू असताना, शरद पवारांनी आत जाऊन फोन घेतला आणि ‘साहेबांचा पाठिंबा आहे’ असा निरोप दिला. साहेबांचा नेमका निरोप काय होता हे पवारच जाणोत. पण ते अडचणीचे प्रसंग चित्रपटात अत्यंत शिताफीनं टाळलेत. उलट ‘साहेबांनी नंतर बाईंसोबत जायला हवं होतं…’ असा पत्रकारांच्या कंपूत सल्ला देणारे पवार! थिएटरबाहेर पडताना एकच प्रश्न मनात रेंगळत राहिला, ही यशवंतरावांची बखर होती की पवारांची खबर?

  • sharad_kul

    blog lekhakani ya chitrapatache ek vastunisth nirikshan ahe chtrapat banvinyarya nirmata digdarshakala tevadhe swantrya hote ka prashanach ubha rahato ajun khup gosthi chitrapatat adhalun yet nahit yashvantrao chi kumpnavarachi bhumika dakhvine aavashyak hote shevati hi documentry film ahe sarkari chakoritil documentrary he varnan yogya hoil

  • umesh jadhav

    WOW.VERY NICE.INFORMATIVE.

close