वाराणसीच्या आखाड्यात मोदी विरुद्ध केजरी’वार’!

March 18, 2014 10:19 AM0 commentsViews: 2017

18 मार्च : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात रंजक लढत असणार आहे ती वाराणसीची..कारण या जागेवर नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा सामना होतोय.

मंदिरांचं शहर असलेल्या वाराणसीत पुढचे दोन महिने राजकीय कुंभमेळा भरतोय. वाराणसीतून नरेंद्र मोदींची उमेदवारी देशात हिंदुत्त्वाचा अंडरकरंट आणेल, अशी आशा भाजपला वाटतेय. 2004 चा अपवाद वगळता 1991 पासून भाजप इथे जिंकत आली आहे.

पण, वाराणसीमध्ये एक वर्ग असा आहे जो मोदींच्या ठाम विरोधात राहील. इथला तब्बल अडीच लाख मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवणं, हे इथे मोदी विरोधकांसाठी मुख्य लक्ष्य असेल.

वाराणसीच्या शेजारी आझमगड हा लोकसभा मतदारसंघ येतो. वारणसीतून यूपीमध्ये जाणार्‍या सॉफ्ट हिंदुत्वाच्या सेदंशाला काउटर करायला मुलायम सिंग यादव इथे उभे राहतील, अशी चर्चा आहे. जर असं झालं तर निवडणूक मंदिर, मस्जिद, मंडलच्या मुद्द्यांवर जाईल. जवळपास सगळ्याच प्रस्थापित राजकीय नेत्यांना हे सोयीचं असेल.

वाराणसीत विकासाचे अनेक मुद्दे उचलण्यासारखे आहेत. आजही रस्ते धुळीने माखलेले आहेत आणि गंगेच्या काठावरचा बनारसी बाबू पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. या मुद्द्यांचा वापर करत केजरीवाल यांना वाराणसीत प्रवेश करता येईल, असं म्हटलं जातंय.

 मिशन 543 : लोकसभा मतदारसंघ : वाराणसी
– हा लोकसभा मतदारसंघ एकूण 5 विधानसभा मतदारसंघांचा बनलेला आहे.
– ह्यात, रोहानिया, वाराणसी उत्तर, वाराणसी दक्षिण, वाराणसी कॅन्टोनमेंट आणि सेवापुरी हे मतदारसंघ आहेत.
– या मतदारसंघात एकूण मतदार आहेत : 16,09,379
– यातले पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आहेत : 35,179

वाराणसी : 2009 चं चित्र
– गेल्या वेळी इथे 15,61,854 मतदार होते.
– त्यापैकी 6,65,490 इतकं म्हणजे फक्त 43 टक्के मतदान झालं होतं.
– भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी ह्यांचा इथे विजय झाला होता. त्यांना 2,03,122 मतं मिळाली होती.
– त्यांच्या विरोधामध्ये बसपने मुख्तार अन्सारी ह्या वादग्रस्त नेत्याला निवडणुकीसाठी उतरवलं होतं. त्यांना 1,85,911 इतकी मतं मिळाली होती.
– तर समाजवादी पक्षाचे अजय राय हे 1,23,784 मतं घेऊन तिसर्‍या क्रमांकावर राहिले.
– काँग्रेसचे तत्कालीन खासदार राजेशकुमार मिश्रा यांना तर फक्त 66,386 मतं मिळवून चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.

2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी इथल्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी 3 हे भाजपाने जिंकले होते आणि प्रत्येकी 1 मतदारसंघ समाजवादी पक्ष आणि अपना दलने जिंकले होते.2012 साली वाराणसी लोकसभा मतदारसंघात येणार्‍या पाचही विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानामधून काय चित्रं उभं राहतंय.

वाराणसी : 2012 विधानसभा निवडणुकीचं चित्र

– भाजपला मिळालेल्या मतांची बेरीज होते 1,91,892
– त्याखालोखाल समाजवादी पक्षाला मतं मिळाली. त्यांची बेरीज होती 1,74,480
– काँग्रेसला ह्या पाचही मतदारसंघांमध्ये एकत्रित मतं मिळाली 1,62,003
– आणि त्याखालोखाल बहुजन समाज पक्षाला मतं मिळाली. त्यांना मतं मिळाली 1,48,934