पश्चिम घाट इको-सेन्सिटिव्ह झोन, राज्यातील 12 भागांचा समावेश

March 18, 2014 6:15 PM0 commentsViews: 1327

western zone eco sensitive zone maharashtra18 मार्च : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटाचा काही भाग इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला आहे. यामध्ये तब्बल 56 हजार 825 स्वे. किमीचा भाग इको-सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात आलाय.

यामध्ये महाराष्ट्रातल्या 17 हजार 340 स्वे.किमी भागाचा समावेश आहे. इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या 6 राज्यांमधला काही भाग येतो. या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये कुठलेही नवे प्रकल्प उभारता येणार नाहीत.

त्याचबरोबर थर्मल पॉवर प्लँट आणि सर्व प्रकारच्या मायनिंगवर बंदी घालण्यात आलीय. 20 हजार स्वे. मीटरपेक्षा जास्त क्षेत्रात बांधकाम आणि नवं शहर वसवणे अशा प्रकारच्या प्रकल्पांच्या विस्तारावरही बंदी घालण्यात आलीय. माधव गाडगीळ यांच्या पश्चिम घाट समितीचा अहवाल आणि कस्तुरीरंगन समितीचा अहवाल याआधारे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांमधल्या काही विशिष्ट भागाचा समावेश यामध्ये करण्यात आलाय. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्या त्या तालुक्यातल्या गावांची यादीही दिली आहे. कोल्हापूरमधील राधानगरी, शाहूवाडी, आजरा,बावडा, भुदरगड, चंदगड, पन्हाळा हे तालुके तर पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव, भोर, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, वेल्हे या तालुक्यातल्या काही गावांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय. सिंधुदुर्गमध्ये देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी या तालुक्यातल्या काही गावांचाही यामध्ये समावेश आहे.

या जिल्हांचा समावेश

 1. अहमदनगर
 2. धुळे
 3. नंदुरबार
 4. पुणे
 5. ठाणे
 6. सातारा
 7. सांगली
 8. कोल्हापूर
 9. रत्नागिरी
 10. सिंधुदुर्ग
 11. रायगड
 12. नाशिक

close