गारपीटग्रस्तांना दिलासा, 4 हजार कोटींचे पॅकेज

March 19, 2014 11:14 PM0 commentsViews: 1056

sdercm_manikrao_nasik19 मार्च : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हतबल झालेल्या शेतकर्‍यांना अखेर सरकारने दिलासा दिलाय. गारपीटग्रस्तांसाठी राज्य सरकारने 4 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. आज (बुधवारी) रात्री राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलीय. या बैठकीत चार हजार कोटींची मदत देण्याची घोषणा करण्यात आलीय.

पण, मंत्रिमंडळाच्या निर्णयाला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ही घोषणा खर्‍या अर्थ्याने शेतकर्‍यांपर्यंत पोहचणार आहे.

यामध्ये कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी हेक्टरी 10 हजार रूपये, बागायती शेतकर्‍यांसाठी हेक्टरी 15 हजार रुपये, फळबागांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये मदत सरकारनं जाहीर केलीय. यापूर्वी मिळणार्‍या नुकसान भरपाईपेक्षा ही नुकसान भरपाई दुप्पट आहे. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्जवसुलीलाही स्थगिती देण्यात आलीय.

तसंच कर्जावरील व्याजमाफीही देण्यात आलीय. तर सहा महिन्यांचं वीज बिल माफ करण्यात आलंय. याशिवाय राज्य सरकारला केंद्राकडून दीड ते दोन हजार कोटींची अपेक्षा आहे. मात्र सरकारने पॅकेज जरी घोषित केलं असलं तरी आतापर्यंत 29 शेतकर्‍यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गारपीटग्रस्तांना मदत

  • - गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना एकूण 4 हजार कोटींचं पॅकेज
  • - मदतीच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक
  • - कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 10 हजार रुपये मदत
  • - बागायतीसाठी हेक्टरी – 15 हजार रुपये मदत
  • - गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या फळबागांसाठी हेक्टरी 25 हजार रूपये मदतीचा प्रस्ताव
  • - राज्य सरकारला केंद्राकडून दीड ते दोन हजार कोटींची अपेक्षा
  • - गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्जवसुलीला स्थगिती
  • - गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या पीक कर्जाला व्याज माफी
  • - गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचं सहा महिन्यांचं वीजबिल माफ होणार
  • - राज्यातल्या पीक कर्जाची फेररचना करणार
close