शेतीच्या पंचनाम्यासाठी गारपीटग्रस्तांची लूट !

March 19, 2014 9:43 PM0 commentsViews: 396

19 मार्च : गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांना भ्रष्ट यंत्रणेनंही कसं बेजार केलंय, याचा गौप्यस्फोट आयबीएन लोकमतने केलाय. गारपिटीमुळे नुकसान झालेला शेतकरी आता नुकसानभरपाईची वाट बघतोय. पण, त्यासाठी आधी पंचनामे होणं गरजेचं आहे. पण, या पंचनाम्यांसाठीसुद्धा शेतकर्‍यांना लाच द्यावी लागतेय. औरंगाबाद तालुक्यातल्या आडगावात हा प्रकार उघड झालाय. पंचनामा करण्यासाठी तलाठ्यानं स्वत: शेतात जाणं गरजेचं असतं. पण, आडगावात पंचनामे करण्यासाठी तलाठ्यांनी चक्क एजंट नेमले आहे. हे एजंट
शेतकर्‍यांकडून पैसे उकळत आहे. हा एजंट तलाठ्यांची सही असलेले पंचनाम्याचे अर्ज घेऊन शेतकर्‍यांकडे जातो आणि त्यांच्याकडून 100-200 रुपये घेऊन पंचनामे भरून घेतोय. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी शेतीत जावून पंचनामा केला पाहिजे. मात्र तलाठी घरात बसून पंचनामे करत आहेत. शेतकर्‍यांना कशी मदत योग्य मिळू शकेल. आयबीएन लोकमतने हा गौप्यस्फोट केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तलाठी वैशाली कामळेंना तात्काळ निलंबित केलंय.

close